भारताचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी पारित करण्यात आले. त्यामुळे हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. हे संविधान २६ जानेवारी १९५० रोजी देशभर लागू करण्यात आले.त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आज संविधानाबाबत काही विशेष गोष्टी जाणून घेऊ या.
२६ जानेवारी १९३० रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने भारताला संपूर्ण स्वराज्य म्हणून घोषित केले होते. म्हणूनच ही तारीख संविधान लागू करण्यासाठी निवडण्यात आली.
भारत स्वतंत्र झाल्यानंतरही एक वेळ अशी आली होती की याच संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हे संविधान जाळून टाकावेसे वाटत होते. पण बाबासाहेबांवर ही वेळ का आली ?
२ सप्टेंबर १९५३ रोजी राज्यपालांचे अधिकार वाढवण्यावरून राज्यसभेत खडाजंगी सुरू होती. यावेळी बाबासाहेब अल्पसंख्यांकांच्या अधिकारांबद्दल जागरूक होते.
तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते, “बहुसंख्यांक आपल्याला त्रास देतील अशी भीती अल्पसंख्यांकांच्या मनात नेहमी असते. अल्पसंख्यांकांना महत्त्व देऊ नका असे बहुसंख्यांक कधीही म्हणू शकत नाहीत.यामुळे लोकशाहीचे केवळ नुकसानच होईल. मी हे संविधान तयार केले आहे असे लोक म्हणतात, पण हे संविधान जाळणाराही मीच पहिला असेन. “
आपल्या विधानाचे समर्थन करण्यासाठी बाबासाहेबांनी एक उदाहरण दिले होते. ते म्हणाले होती की, “आपण देवासाठी मंदिर बांधलं. पण देवांची प्रतिष्ठापना करण्यापूर्वीच तेथे राक्षस येऊन राहू लागले तर ते मंदिर तोडून टाकण्याशिवाय पर्याय नसतो. “
संविधानात आतापर्यंत १०५ वेळा घटनादुरुस्ती झाली आहे. १९७६ सालची ४२वी घटनादुरुस्ती अधिक प्रसिद्ध आहे. यावेळी संविधानाच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि अखंड हे तीन शब्द जोडण्यात आले.
भारतीय संविधान हे जगातील सर्वांत दीर्घ स्वरुपाचे संविधान आहे. यात २५ भाग, १२ अनुसूची आणि ४४८ अनुच्छेद आहेत.
२४ जानेवारी १९५० रोजी संविधान सभेच्या २८४ सदस्यांनी संविधानावर स्वाक्षरी केली होती. यात दुर्गाबाई देशमुख, विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, अम्मू स्वामिनाथन, दक्षिणायिनी वेलायुदन, बेगम रायसुल, इत्यादी १५ महिलांचा समावेश होता.
‘संविधान जाळणारा मी पहिला असेन’, असं डॉ. आंबेडकर का म्हणाले होते ?
- Advertisement -