नांदगाव खंडेश्वर : वर्धा मतदार संघाचे खासदार रामदासजी तडस यांना नांदगाव खंडेश्वर येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात 2 मार्च बुधवार रोजी निवेदन देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.
निवेदनात म्हटले की, प्रधानमंत्री आवास योजनेतील नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतने घरकुलासाठी दि.7 सप्टेंबर 2018 ला मंजुरात दिली पहिला हप्ता 40000 रु 13 जून 2019 ला दिला. दुसरा हप्ता दि.20 जानेवारी 2020 ला 60000 रुपये दिला तो मिळवण्यासाठी माकपच्या नेतृत्वात म्हाडाचे मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्यात आले होते. तिसरा हप्ता मिळण्यासाठी माकपने राहुटी आंदोलन करिता प्रशासनाचे लक्ष वेधले. तिसरा हप्ता न मिळाल्यामुळे अध्यापही घरकुलांचे बांधकाम अर्धवट आहे. लाभार्थ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे.
“केंद्र सरकारने राज्यातील महाविकास आघाडी सरकारला प्रधानमंत्री आवास योजनेतील पाठविलेल्या निधी बाबतचा हिशोब मागितला आहे. निधी कसा व कुठे खर्च झाला याचा हिशोब मागणे गैर नाही. राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी लाभार्थ्यांची अडवणूक करू नये. मार्च महिन्यात घरकुलाचा निधी मिळेल.”
– रामदास तडस, (खासदार, वर्धा)
भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. महागाईची भरमसाट वाढ झाल्याने प्रधानमंत्री आवास योजनेतील घर पूर्ण होणार का? कि स्वप्न राहणार याची चिंता लाभार्थ्यांना सतावत आहे. शिल्लक अनुदानाच्या ते द्या, डीपी आर मंजूर असलेल्या लाभार्थ्यांना घराचे बांधकाम सुरू करण्यासाठी अनुदान द्या, प्रधानमंत्री आवास योजनेची लॉगिन साईट सुरू करावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी माकपाचे तालुका सचिव शाम शिंदे, प्रकाश मारोडकर, पुंडलिक पुंड, विनोद गोलाईत, मनोज केडिया, दीपक शिंदे, आकाश जवणे, गजानन मारोडकर, खालीद भाई, संजय सोनोने, दिनेश अंबाडकर , दिनेश बावणे, दीपक पिगळे, किशोर शिंदे उपस्थित होते.