Tuesday, January 14, 2025
HomeNewsमंदिरांपेक्षा रूग्णालये गरजेची : सुशिलकुमार पावरा

मंदिरांपेक्षा रूग्णालये गरजेची : सुशिलकुमार पावरा

रत्नागिरी : आजच्या घडीला मंदिरांपेक्षा रूग्णालयांची अत्यंत गरज आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते तथा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल सुशीलकुमार पावरा यांनी व्यक्त केले.   

कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढती रूग्णसंख्या पाहता रूग्णालये कमी पडताना दिसत आहेत.मनुष्यबळही अपुरे पडताना दिसत आहे. एरव्ही प्रत्येकाला आपली जात व धर्म महत्वाचा वाटतो.त्यामुळे जात व धर्माच्या नावावर एकमेकांचे जीव घेतल्याच्याही आपल्याला पाहवयास मिळतात. परंतु आज हे सगळं फोल ठरत आहे. कारण आज रूग्णांना वाचवायला कोणताच देव येत नाही आहे तर देवासारखी मदतीला येणारी माणसं आल्यामुळे जीव वाचला याचा साक्षात्कार नव्याने होताना दिसत आहे. त्यामुळे आपले प्राण किती महत्त्वाचे आहेत आणि ते प्राण कुणामुळं वाचले?याची जाणीव रूग्णांना तर होतच आहेत. त्याचबरोबर नातेवाईकांनाही त्याचा प्रत्यय येत  आहे.

आतातरी सर्वांनीच जातीच्या व धर्माच्या नावाखाली मंदिराचे राजकारण करत लोकांच्या मनात विष परसविणा-या राजकीय मंडळींचा कावा ओळखून त्यांना ठिक ठिकाणी  मंदिरे बांधण्यापासून रोखून प्रत्येक गावागावात अद्ययावत रूग्णालये उभारावीत व त्यात पुरेसे डाॅक्टर, नर्स इत्यादी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावेत.यासाठी आग्रह धरावा.कारण यापुढे रूग्णालयेच कामात येणार आहेत, मंदिरे नाही.कोरोनाने तेवढा हाहाकार माजवलेला आहे. 

मंदिरासाठी लाखो व करोडो रूपये देणगी देणारे काही  लोकप्रतिनिधी ,आमदार, खासदार कोरोनाच्या या भयावह स्थितीत जनतेसाठी स्वतः चा एक रूपयाही खर्च करताना दिसत नाही आहे. आरोप प्रत्यारोप करून सगळे खापर सरकारी यंञणावरच फोडून मोकळे होत आहेत. तेव्हा ज्या पद्धतीने मंदिरासाठी लाखो निधी जमा करण्यासाठी जनतेला आवाहन लोकप्रतिनिधी करत होते त्याच पद्धतीने आज  रूग्णांसाठी उपचारासाठी व  रूग्णालये बांधण्यासाठी स्वतःचे लाखो रूपये देत जनतेला निधी देण्यास लोकप्रतिनिधींनी आवाहन करण्याची गरज आहे. 

सर्वांना सुखी ठेव देवा, हेच मागणे आमचे तुझ्या ठायी, ही प्रार्थना लहानपणी आम्ही शाळेत दरदिवशी एकसूरात म्हणायचो. लहानपणी प्रार्थनेचा अर्थ आम्हाला  कळत नव्हताच ,नुसतं पोपटपंची चालायची.पण आता कोरोनाने भयंकर स्थिती निर्माण केल्याने या प्रार्थनेचा अर्थ आणि त्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे. आजूबाजूला कोरोनामुळे दगावणारी मित्र मंडळी, नातेवाईकांना बघून हृदयात धडधड वाढतच चालली आहे. उद्या काय होईल याची शाश्वती नाही.कोरोनाचे रोज नवीन नवीन रूग्ण, मृत्यूसंख्या वाचून मन थर थर कापते.कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांना व वयस्कर लोकांना अधिक धोका म्हणून वर्षभर घरातच बसून गेले.माञ आता दुस-या लाटेची तीव्रता एवढी वाढताना दिसते की यात वयोगट नाहीच तर सरसकट सगळ्याच वयाची लोक बाधित होत आहेत. 

       सध्या प्रत्येकाच्या मनात कोरोनाची भिती आहेच. आपण एकामेकांच्या संपर्कात येऊन बाधित होऊ , म्हणून प्रत्येक जण एकामेकांना संशयाने बघतच आहे. नवीन दिवस उजाडला ची अशुभ वार्ता ऐकू येऊ नये यासाठी सगळेच मनोमन प्रार्थना करत आहेत. तेव्हा बेफिकीर न राहता आतातरी या कोरोनामुळे काहीतरी बोध घेण्याची गरज आहे. कोरोना आपल्या सर्वांना खूप काही शिकवत आहे. माणूसकी, सर्वधर्मसमभाव, निस्वार्थ भावना, निस्वार्थ सेवा, संयम, माणसांच्या मूलभूत गरजा व अनावश्यक गरजा, मृत्यूसमोर कोण श्रीमंत आणि कोण गरीब इत्यादी सर्व गोष्टींचा जाणीव मनुष्याला कोरोनामुळे झालेली आहे. तेव्हा आतातरी भविष्यातली आपली महत्त्वाची गरज ओळखून मंदिर बांधण्यात अनावश्यक खर्च करण्यापेक्षा गावागावात रूग्णालये बांधण्यात सरूवांनीच खर्च करावा.मंदिरासाठी जसा लाखो व करोडो निधी जमा करतो तसाच निधी रूग्णालय बांधण्यासाठी जमा करावा. गावागावात मंदिरापेक्षा रूग्णालयांची संख्या वाढावी. कारण हीच काळाची गरज आहे, असेही पावरा म्हणाले.


संबंधित लेख

लोकप्रिय