मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाल्यानंतर त्या व्यक्तीला आता पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत जाता यावा यासाठी राज्य सरकार एक महत्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे, यासाठी गृहविभागातर्फे प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याची माहिती गृहविभागाने ट्विटरद्वारे दिली आहे.
पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे, यासाठी गृहविभागातर्फे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनानंतर याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
— HMO Maharashtra (@maharashtra_hmo) July 3, 2021
राज्यात यंदाचे पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलै रोजी होत आहे. कोरोनामुळे अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर मंत्रालयात एक मंत्रिमंडळ बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात येईल, असे दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
दरम्यान, पुण्यातील एका कार्यक्रमात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले होते की, पोलिस दलात ३ दशक सेवा दिल्यानंतरही शिपायांना केवळ ASI पदावर येऊन निवृत्ती मिळते. पोलिस शिपाई म्हणून रुजू झालेल्या प्रत्येकाला PSI पदावर पोहोचता यावे आणि निवृत्तीच्या ५ वर्षांपूर्वीपर्यंत या अधिकारी पदावर काम करता यावे अशी योजना असल्याचे संकेत गृहमंत्र्यांनी दिले होते.