Thursday, August 11, 2022
Homeरविवार विशेषदिनविशेष : तांड्याचा नायक ते महाराष्ट्राचा नायक - वसंतराव नाईक

दिनविशेष : तांड्याचा नायक ते महाराष्ट्राचा नायक – वसंतराव नाईक

spot_imgspot_imgspot_imgspot_img

महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली या गावातील बंजारा समाजातील एका शेतकरी कुटुंबात १ जुलै १९१३ रोजी वसंतराव नाईक यांचा जन्म झाला. आईचे नाव होनुबाई व वडिल फुलसिंग नाईक. पुढे या महामानवाचा जन्म दिवस कृषी दिन म्हणुन संपुर्ण महाराष्ट्रात एव्हाना भारतभर साजरा केला जातो. त्यांनी ६ जुलै १९४१ रोजी वत्सला घाटे (ब्राम्हण), नागपूर यांच्यांशी आंतरजातीय विवाह केला. ते नेहमी बंद गळ्याचा कोट, तोंडात चिरुट, चमकदार सोनेरी चष्मा असा त्यांचा आधुनिक पध्दतीचा राहणीमान कारण वसंतराव नाईक यांच्यावर महात्मा फुले, डेल कार्नेन तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव होता. बंजारा समाजातील पहिले वकिल तसेच पुसद नगरपालिकेचे अध्यक्ष, मध्यप्रदेशाचे महसूल खात्याचे उपमंत्री, महाराष्ट्राचे सहकार मंत्री, कृषी मंत्री, महसूल मंत्री याशिवाय सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. विरोधी पक्षांचा आदर करणारा माणूस असा हा त्यांचा जिवन प्रवास. मला घडविण्यामध्ये “माझ्या आई वडिलांचा, माझ्या भावांचा, माझ्या जनतेचा जेवढा वाटा आहे तेवढाच यशवंतराव चव्हाण यांचा आहे”.

बंजारा समाजाविषयी आपली भुमिका स्पष्ट करताना वसंतराव नाईक सांगतात की, “माझ्या आईपेक्षाही मला समाज अधिक प्रिय आहे”. अशी भूमिका अंगाशी बाळगून सातत्याने विरोधकांचा बिमोड केला. तसेच त्यांना समाज कार्याची आवड लहानपणापासूनच व त्यांच्या वडिलांकडून मिळाली होती. वसंतराव नाईक यांचा समाजातील रुढी परंपरा आणि अंधश्रद्धेवर विश्वास नव्हता. तसेच ते बंजारा समाजातील स्त्रियांच्या पोशाखात बदल करण्याबद्दल ते नेहमी आग्रही होते. त्याचबरोबर दारुबंदीच्या कार्यक्रमाचा शुभारंभही त्यांनी आपल्या गावापासूनच केला. तसेच भटक्या विमुक्त जाती आणि जमातीच्या मुलांना व इतरही समाजातील मुलांना चांगले शिक्षण घेता यावे या उद्देशाने त्यांनी महाराष्ट्रात एकूण ७०० आश्रम शाळा सुरू केल्या होत्या (पण आज त्यांची स्थिती फार दयनीय झाली आहे, यावर संशोधन होणे गरजेचे आहे) त्यांनी कोणताही नवीन बदल घडवून आणताना पहिले स्वत: पासुन सुरुवात करायचे, जेणेकरुन इतर लोकं त्यांचे अनुकरण करतील.

वसंतराव नाईक यांना इतर सर्व बाबींपेक्षा शेती हा विषय अधिक जवळचा होता त्यामुळे ते म्हणतात की, “शेतकऱ्यांला पाणी मिळाले की तो चमत्कार करून दाखवतो”. महाराष्ट्रासाठी केंद्राकडे एकच कृषि विद्यापीठाची तरतुद असतांना त्यांनी एकुण चार कृषी विद्यापीठ महाराष्ट्राला देऊन प्रादेशिक असमतोल दूर केला व कृषि विकासाला चालना दिली. तसेच ते १९६३ साली पहिल्यांदा मुख्यमंत्री पदी विराजमान झाले त्यावेळी महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता, व या त्यांच्या ११ वर्षाच्या कार्यकाळात पाच मोठे दुष्काळ त्यांनी अनुभवले यामुळे अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी त्यांनी पुण्याच्या शनिवारवाडा येथील भाषणात असे ठामपणे सांगितले की, “येत्या दोन वर्षांत महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करू शकलो नाही तर मी स्वत फाशी घेईन” असे सांगितले. शेती आणि शेतकरी हा त्यांचा आवडता छंद किंवा विचार होता.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शेतजमिणीचे राष्ट्रीयकरण करण्यासंदर्भातील भुमिका त्यांनी कृतीत उतरवली. भारताचे माजी कृषिमंत्री शरद पवार एके ठिकाणी सांगतात की, ‘दुष्काळ किंवा आपत्तीशी सामना कसा करावा हे मला वसंतराव नाईक यांच्याकडून शिकायला भेटले’. शेती हा त्यांचा आवडता भाग असल्या कारणाने त्यांनी त्यांच्या काळात औरंगाबाद येथील जायकवाडी धरण, उजणी धरण, कोयना धरण, अप्पर वर्धा, पेंच, चास, अरुणावती, कालीसरार दोन यांच्यासह ७० धरणांचा काम वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री असताना केलेले दिसते. त्यांची बरोबरी आजचा एकही मुख्यमंत्री करु शकत नाही. महाराष्ट्रातील खेड्यात विज पोहचावी म्हणुन त्यांनी खापरखेडा, पारस, भुसावळ यांसारखे औष्णीक विद्युत केंद्र तसेच पोफळी, वेलदरी सारखे जलविद्युत प्रकल्प उभारले. तसेच आज भारतभर चालु असलेली रोजगार हमी योजना इ. अनेक लोकोपयोगी योजना फक्त कागदोपत्रीच नाही तर प्रत्यक्षात त्यांनी राबवल्या त्याचा फायदा आजही अनेकांना होत असल्याचा दिसुन येतो. अमेरीकेकडुन घेतला जाणारा मिलो नावाचा गहु बंद करून त्यांनी महाराष्ट्रात हरित क्रांती घडवून आणली व त्या माध्यमातून त्यांनी H_4, CSH-1 या हायब्रीड ज्वारीचे संकरीत बियाणे निर्माण करुन अन्नधान्याची टंचाई दूर केली. तसेच त्यांनी शेतकऱ्यांसाठी बियाणे महामंडळची स्थापन केले. इत्यादी अनेक शेती विषयक धोरण वसंतराव नाईक यांनी त्यांच्या काळात राबवले. महाराष्ट्रात १९६५ साली हरित क्रांती व धवल क्रांती घडवून आणली त्यामुळे त्यांना वसंतराव नाईक यांना ख-या अर्थाने शेतकऱ्यांचा कैवारी असंही म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. “कृषि क्रांती ही रक्त सांडण्याची नसुन घाम गाळण्याची आहे” असे ते वारंवार म्हणत असे.

या शिवाय वसंतराव नाईक यांनी इतर क्षेत्रांमध्ये देखील काम करायला विसरले नाही त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करून बुटीबोरी-नागपुर, वाळुज-औरंगाबाद, सातपुर, अंबड- नाशिक, इस्लामपूर-सांगली, लातुर इ.औद्योगीक वसाहती तसेच नवीन औरंगाबाद व नवी मुंबईची निर्मिती, (पण आज येथील विमानतळाला कोणाचे नाव द्यायचे यावर वादंग सुरू आहे.) सिडको-हडको, मराठी भाषेला मिळवुन दिलेला राज भाषेचा दर्जा, ग्राम सुधारणा, पंचायत राज, सुतगीरणी, अनुसुचित जाती अनुसुचित जमाती प्रमाणे भटक्या विमुक्त जाती आणि जमाती यांच्यासाठी राज्यात तिसरी सुची १६ (४) ब चा अधार घेऊन या वंचित घटकांना आरक्षणाचा निर्णय, तसेच राज्यातील पहिले खुले कारागृह पैठण येथे सुरू केले, मटका व जुगारांना आळा बसावा म्हणून राज्य शासनाची लाॅटरी सुरू केली इ. अनेक कामे वसंतराव नाईक यांनी त्यांच्या ११ वर्षाच्या कार्यकाळात पुर्ण केली होती. हे सुप्त गुण यशवंतराव चव्हाणांनी हेरल्यामुळेच त्यांनी केंद्राला (दिल्ली) असे सांगितले होते की, ‘महाराष्ट्र हा वसंतराव नाईकांच्या हाती सुरक्षीत असेल’ असा निर्वाळा दिला होता. म्हणुनच ते महाराष्ट्राचे सर्वाधीक काळ मुख्यमंत्री म्हणुन राहिले हेही या ठिकाणी आर्वजुन सांगावे लागते. सरते शेवटी असं म्हणेन की परिवर्तनवादी विचार असलेल्या वसंतराव नाईक यांच्या विचाराला, आचाराला आणि व्यक्तीमहत्वाला जे पुजन करतात त्या सर्वांना त्यांच्या १०८ व्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.

या जयंतीनिमित्त प्रत्येकांनी एक असाही निर्णय घ्या की या वर्षी मी एक झाड लावणार आणि ते जगवणार देखील.

– बळीराम शेषेराव चव्हाण

– एम.फिल ( राज्यशास्त्र )

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

– ९०२८४४६९४२

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय