घोडेगाव : कोळवाडी ता.आंबेगाव येथे, जेष्ठ स्रीरोगतज्ञ, डॉ.मोहन साळी यांनी ॲनिमिया (रक्तक्षय) या विषयावर महिलांना नुकतेच सविस्तर मार्गदर्शन केले.
आदिम संस्कृती अभ्यास, संशोधन व मानव विकास केंद्र या संस्थेच्या वतीने कोळवाडी ता.आंबेगाव येथे मागील काही महिन्यांपासून रोटरी क्लब, पुणे यांच्या सहकार्याने साक्षरता वर्ग सुरु आहेत. या साक्षरता वर्गात महिलांना लेखन – वाचन शिकवले जाते त्याचबरोबर कायदा साक्षरता, आर्थिक साक्षरता, आरोग्य साक्षरता याचेही धडे दिले जातात.
नुकतेच, गावातील सर्व महिलांचे रक्तातील लोहाचे प्रमाण, तपासण्यात आले होते. यावेळी अनेक महिलांचे रक्तातील लोहाचे प्रमाण हे अत्यंत कमी दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर गावातील कुटुंबांना पोषणयुक्त व विषमुक्त आहार मिळावा यासाठी जवळपास १२० कुटुंबात परसबाग करण्यात आली आहे. या कुटुंबांना परसबाग लागवडीसाठी संस्थेच्या वतीने बियाणे ही दिले गेले आहे.

योग्य पोषण आहार न घेतल्यास महिलांमध्ये अनिमिया (रक्तपांढरी) हा आजार दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ.मोहन साळी यांनी महिलांना या आजाराविषयी अत्यंत मुलभूत माहिती सोप्या भाषेत समजावून सांगितली. यामध्ये, त्यांनी रक्तामधील लोहाची कमतरता झाल्याने होणारे आजार, त्यासाठी आपण योग्य आहार व आपली जीवनशैली यामध्ये बदल केल्यास ॲनिमियावर मात करू शकतो.असे नमूद केले. यासोबतच त्यांनी ॲनिमियाची लक्षणे, कारणे आणि त्यावरील उपाय उदाहरणासहित सांगितले.
हिरव्या पालेभाज्या व आपल्या आजूबाजूला असणारे फळे यांचा समावेश आपल्या आहारामध्ये केल्याने रक्तातील लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत होते असेही त्यांनी यावेळी नमूद केले. या कार्यक्रमासाठी, जनवादी महिला संघटनेच्या नेत्या कमलताई बांबळे, सामाजिक कार्यकर्त्या उमाताई मते उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे समन्वय आदिम संस्थेचे डॉ.अमोल वाघमारे, प्रा.स्नेहल साबळे, समीर गारे, दिपाली खामकर यांनी केले. तर स्थानिक संयोजन सुप्रिया मते, प्रियंका बुरसे, सुनंदा डगळे यांनी केले होते.
