Saturday, March 15, 2025

उद्योगातील घातक कचरा स्वीकारला जाणार नाही-आयुक्त शेखर सिंह

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: औद्योगिक परिसरातील निर्माण होणा-या केवळ अघातक औद्योगिक कच-याचे संकलन महापालिकेमार्फत जानेवारीपासून सुरु करण्यात आले आहे.कंपन्यांनी घातक कचरा महापालिकेच्या संकलन व्यवस्थेत दिल्यास कारवाईचा इशारा महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील औद्योगिक वसाहतीमधील घनकचरा व्यवस्थापनाबाबत यापूर्वी वेळोवेळी मागणी करण्यात आलेली आहे. त्यास अनुसरुन वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये तसेच 21 डिसेंबर 2022 रोजीचे क क्षेत्रीय कार्यालयामध्ये लघुउद्योजक, उद्योजक व MCCIA यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत सविस्तर बैठक घेण्यात आली. त्यामध्ये निश्चित करण्यात आलेल्या धोरणानुसार महापालिकेमार्फत औद्योगिक परिसरातील अघातक घनकचरा संकलन करण्याचे काम 2 जानेवारीपासून प्रत्यक्ष सुरु करण्यात आले आहे.

अधिनियमातील प्रचलित तरतूदी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश विचारात घेऊन औद्योगिक परिसरातील निर्माण होणा-या केवळ अघातक औद्योगिक कच-याचे संकलन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. प्रचलित कायद्यातील तरतूदीनुसार घातक कच-याची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावणे औद्योगिक आस्थापनांवर बंधनकारक असल्याने, त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे उद्योजकांनी मान्य केलेले आहे. अशा स्वरुपाच्या घातक कच-याच्या अशास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावल्यामुळे पर्यावरणाची हानी होते तसेच त्यावर प्रक्रिया करणे या बाबींवर मोठा परिणाम होतो. तसेच ते कायद्याने निषिध्द आहे.

सर्व औद्योगिक आस्थापनांनी महापालिकेतर्फे सुरु करण्यात आलेल्या कचरा संकलनामध्ये त्यांच्या आस्थापनेतून निर्माण होणारा केवळ अघातक घनकचरा देणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत घातक कचरा मिश्र स्वरुपात देण्यात येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. कोणत्याही औद्योगिक आस्थापनेद्वारे घातक कचरा महापालिकेच्या संकलन व्यवस्थेत दिल्याचे आढळून आल्यास नाईलाजाने संबंधित आस्थापनेविरुध्द घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 व प्रचलित कायद्याच्या आधारे कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त सिंह यांनी केले आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles