हरियाणा : नूह जिल्ह्यात धार्मिक शोभायात्रेत दोन समुदायात झालेल्या हिंसाचारानंतर राज्यात अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण आहे. नूह, गुरुग्राम आणि मेवातमधील अनेक ठिकाणी दोन गटांमध्ये झालेल्या तुफान दगडफेक आणि जाळपोळीत आतापर्यंत पाच लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गुरुग्राममध्ये जमावाने एका मशिदीला आग लावून तेथील इमामाची हत्या केल्याची घटना देखील समोर आली आहे. त्यामुळे गुरुग्राममध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही समुदायातील असामाजिक घटकांनी एकमेकांची प्रार्थनास्थळे जाळली आहेत.
त्यामुळे आता हरयाणातील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. राज्यातील अनेक शहरांमधील पोलीस बंदोबस्त वाढण्यात आला असून दोन्ही गटातील समित्यांची संयुक्त बैठका बोलावण्यात आल्या आहे.
दंगेखोरांनी एकूण 120 वाहनांची नासधूस करून 50 पेटवून दिली आहेत, त्यात पोलिसांची 8 वाहने आहेत. गुरुग्रामसह हरयाणातील हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने दंगलग्रस्त भागांमध्ये पोलिसांच्या मदतीला रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात केले आहे. सोहना, नूह आणि गुरुग्राममध्ये या दलांनी ध्वजसंचलन सुरू केले असून धार्मिक स्थळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
नुह जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तर शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहे. नुह जिल्ह्यातील सर्व इंटरनेट सेवा 2 ऑगस्टपर्यंत बंद करण्यात आली असून जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. प्रशासनाने नुह आणि सोहना येथे आयोजित केलेल्या बैठकीत हिंदू आणि मुस्लीम प्रतिनिधीनी शांतता राखण्यासाठी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.