Friday, March 14, 2025

डहाणू मधील आदिवासी विद्यार्थ्यांची गिनीज बुक मध्ये नोंद

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

गिनीज बुक मध्ये नोंद झालेले विद्यार्थ्यांना शिक्षकांसमवेत

डहाणूग्रामीण भागातील आणि शहरी भागातील विद्यार्थी यांची नेहेमी तुलना होत असते. ग्रामीण भागातील मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता व एक प्रकारचा न्यूनगंड असल्याचा पाहायला मिळत परंतु याच मुलांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाल्यास ते स्वतःला सिद्ध करून उंच अशी उतुंग भरारी घेऊ शकतात हेच सिद्ध केलय पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील डहाणू तालुक्यातील रानशेत येथील आश्रम शाळेनं.

 

एकात्मिक आदिवासी प्रकल्प अंतर्गत शिक्षण प्रसार मंडळाची पालघर येथील डहाणू तालुक्यात रानशेत येथे अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा आहे. आश्रम शाळेचे मुख्याधापक बी. एस. गायवल व विज्ञान शिक्षक बापू चव्हाण व वैशाली गवादे त्याचबरोबर इतर शिक्षकांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहानामुळे व आयोजक मार्टिन ग्रुप चे मिलिंद चौधरी यांच्या सहकार्यामुळे डॉ. ए. पी. जी. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन व स्पेस झोन इंडिया अंतर्गत आयोजित केलेल्या स्पेस रिसर्च पँसोड क्यूब्ज चॅलेंज २०२१ या उपक्रमामध्ये सहभागी होऊन जागतिक आशिया व भारतीय विक्रमामध्ये नोंद करण्याची संधी या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहे. गिनिज बुक मध्ये देखील या उपक्रमाची नोंद झाली आहे.

गिनिज बुक मध्ये नोंद झाल्यानंतर मिळालेल्या  प्रमाणपत्रांसमवेत अंजू भोईर

अतिशय दुर्गम व आदिवासी भागामध्ये हि आश्रम शाळा असून इंटरनेट, स्मार्ट फोन यासारख्या सुविधा देखील फारश्या पोहचल्या नाहीत अश्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची उपग्रह बनवण्यासाठी निवड होऊ शकते ते तेथील शिक्षकांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळेच. हिरा मातीत देखील चमकतो या उक्ती प्रमाणे या शिक्षकांनी आदिवासी भागातील हे हिरे पारखण्याचे काम केलं आहे. त्याचबरोबर यामध्ये सहभागी होण्याकरिता लागणारे शुल्क भरून मार्टिन ग्रुपने मोलाची साथ दिल्याचे तेथील मुख्याधापक सांगतात. यावेळी प्रकल्प अधिकारी आसीमा मित्तल यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

येथील अंजू कमलाकर भोईर, अंकुश अरविंद मोर, मंजूळा चंदू माळवकर, प्रफुल्ल राजेश सातवी, साईनाथ नंदू कोम, प्रशांत विष्णू भोईर, मनाली आनंद बालशी, नंदिनी प्रदिप वधन, मनिषा रघुनाथ जाधव, श्रेया हरुशी पारधी या दहा विद्यार्थ्यांची निवड या उपक्रमासाठी झाली होती. यातील सहभागी झालेली अंजु भोईर या विद्यार्थिनीच्या पालकांशी ‘महाराष्ट्र जनभूमी’ने संपर्क साधला असता या विद्यार्थिनीचे आईवडिलांचे साधे पहिली देखील शिक्षण झाले नसून आर्थिक परिस्थिती देखील हालाखीची आहे. आई – वडील शेत मजुरी करतात. घरी आई-वडिलांना शिक्षणाचा गंध नसताना आर्थिक परिस्थिती जरी बेताची असली तरी शाळेतील शिक्षकांच्या पाठिंब्यामुळे या उपक्रमामध्ये मला सहभागी होता आल्याचे मत तिने यावेळी स्पष्ट केले. 

 

या उपक्रमामध्ये आश्रम शाळेतील दहावी, बारावीतील गरीब कुटुंबातील होतकरू व प्रज्ञावंत अशा दहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये उपजत बुद्धिमत्ता, कला गुण असतात त्यांना योग्य वाव दिल्यास व प्रोत्साहन मिळाल्यास ते स्वतःला सिद्ध करू शकतात. असेच प्रोत्साहन मिळाल्यास, शालेय स्तरावर योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थ्यांमधील विज्ञानाबद्दल जिज्ञासा निर्माण होऊन वैज्ञानिक तयार होण्यास वेळ लागणार नाही व खऱ्या अर्थाने डॉ. ए.पी. जी. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत साकार होईल.

– संपादन : सुमती डोंगरे


Related Articles

- Advertisement -

Latest Articles