आंबेगाव (दि.१०) : गंगापूर खुर्द येथील गाडेकरवाडी येथे स्थानिक तरुणांच्या व ग्रामस्थांच्या पुढाकारातुन ग्रंथालय सुरू करण्यात आले.
साहित्यदीप वाचन चळवळीच्या वतीने आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात सुरू झालेल्या प्रत्येकी ग्रंथालयाला १२५ पुस्तके आणि नवीन पुस्तकांचे कपाटे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आपटी, घोडेवाडी (बोरघर), फुलवडे, थुगाव, न्हावेड, अवसरी खुर्द अशा सहा गावात ग्रंथालये सुरू झाली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गंगापूर खुर्द येथील गाडेकरवाडी येथे देखील ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात वाचन चळवळ रुजावी, गावातील युवक-युवती यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, हा उद्देश ग्रंथालये सुरु करण्यामागे, साहित्यदिप वाचन चळवळ यांनी व्यक्त केला आहे. साहित्यदीप वाचन चळवळीचे पदाधिकारी जीएसटी उपायुक्त महेश जगताप, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वायाळ, उद्योजक विजय केंगले आणि डॉ. अमोल वाघमारे यांनी यापुढेही ‘गाव तेथे ग्रंथालय’ ही मोहीम सुरू ठेवण्याचा निर्धार केलेला आहे. बालसाहित्य, कथा कादंबऱ्या, स्पर्धा परीक्षेची पुस्तके, आत्मचरित्र अशा स्वरूपाची पुस्तके या ग्रंथालयांना दिली आहेत.
गंगापूर खुर्द येथील गाडेकरवाडी येथे दि.९ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून ग्रंथालयाचा उदघाटन समारंभ पार पडला. गंगापूर खुर्द चे सरपंच राजू गाडेकर यांच्या हस्ते ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. गंगापूर खुर्द येथे ग्रंथालय सुरू करण्यासाठी एस.एफ.आय. चे कार्यकर्ते मंगेश गाडेकर यांनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी रमेश गाडेकर ,सूरज गाडेकर, गंगापूर खुर्द चे सरपंच राजू गाडेकर, बाळू गवारी,मंगेश गाडेकर,केदारी सर, बबन गाडेकर,सचिन मधे,अर्चना मधे, अंगणवाडी सेविका नबाबाई भालेराव इत्यादी स्थानिक तरुण व ग्रामस्थ उपस्थित होते.