Saturday, December 7, 2024
Homeजिल्हादबल्या पिचलेल्यांना मुक्तीचा मार्ग दाखवणारे महान नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा...

दबल्या पिचलेल्यांना मुक्तीचा मार्ग दाखवणारे महान नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतीबा फुले

बार्शी (सोलापूर) : ऑल इंडिया स्टुडंन्ट फेडरेशन व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संयुक्त विद्यमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 130 व्या जयंती निमित्ताने ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी कॉम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारी आजची लोकशाही आहे काय? राजकीय समता ही आर्थिक व सामाजिक समतेच्या हाडा मासाने बनलेली असते त्यासाठी आर्थिक व सामाजिक समता यावी लागेल तरच राजकीय समतेला अर्थ आहे, जगण्याचा अधिकार, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क या बाबी मूलभूत अधिकारात असण्याऐवजी संविधानामध्ये या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये गेल्या आहेत,  बाबासाहेबांना जे संविधानामध्ये देता आले नाही ते, राज्यसमाजवाद या पुस्तकामध्ये मांडले आहे, बाबासाहेबांचायांचा स्वतंत्र मजूर पक्ष श्रमजीवींना सत्ता काबीज करण्यास सांगतो, श्रमिकांचा स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचे बाबासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करतात, कष्टकऱ्यांना आर्थिक, सामाजिक न्याय दिल्या शिवाय लोकशाही पूर्ण होणार नाही असे ते म्हणाले.

ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लोकशाही विषयक विचार यावर विषयावर भारतीय कम्युनिस्ट पक्ष व ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने आयोजित व्याख्यानात बोलत होते. तर महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य व विचार यावर कॉम्रेड मोहिनी गोरे बोलत होत्या.

कॉम्रेड मोहिनी गोरे म्हणाल्या, महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य हे बिनतोड आहे आजच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागत आहेत, फुल्यांना हे अपेक्षित नव्हते, महात्मा फुले यांनी समाजामधील अनिष्ट रूढी परंपरा यांच्या विरोधामध्ये जबरदस्त लढा दिला, ब्राह्मणवादाला धक्का देऊन रचनात्मक काम उभा केले, शिवाजी महाराजांची समाधी हुडकून त्यांच्यावर पोवाडा लिहिला, महात्मा फुले यांचे विचार आजही लागू पडतात, यामुळेच दबल्या पिचलेल्यांना मुक्तीचा मार्ग दाखणारे महान नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले पूढे येतात.

ऑनलाइन व्याख्यान यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड प्रवीण मस्तुद, कॉम्रेड पवन आहिरे, कॉम्रेड अनिरुद्ध नखाते, दीपक कोकाटे, आयाज शेख, अविराज चांदणे आदींनी प्रयत्न केला

संबंधित लेख

लोकप्रिय