Monday, January 13, 2025
HomeNewsकोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या पदभरतीत स्थानिक आदिवासी उमेदवारांना प्राधान्य द्या – बिरसा...

कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या पदभरतीत स्थानिक आदिवासी उमेदवारांना प्राधान्य द्या – बिरसा फायटर्सची मागणी

दापोली : कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत पदभरतीत रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक आदिवासी उमेदवारांना प्राधान्य द्या, अशी मागणी बिरसा फायटर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी विद्यापीठ चे कुलगुरू यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. विद्यापीठाचे कुलसचिव सुनिल दुसाणे यांच्याशी सुशिलकुमार पावरा यांनी या विषयी 10 मिनिटे चर्चा केली. याविषयावर कुलगुरू सकारात्मक आहेत, अशी माहिती कुलसचिव सुनिल दुसाणे यांनी दिली.

निवेदनात म्हटले आहे की, आपल्या दापोली कृषी विद्यापीठात स्थानिक आदिवासी उमेदवारांचे नोकरीचे प्रमाण वर्षानुवर्ष 0% आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठ असून विद्यापीठाच्या अंतर्गत एकही स्थानिक आदिवासी उमेदवार कुठल्याही पदावर नोकरीला नाही, ही फार मोठी दुदैवाची बाब आहे. भारतीय संविधानानूसार अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील उमेदवारांना पदभरतीत 7.50% आरक्षण आहे. परंतु त्यानुसार आपल्या विद्यापीठात पदभरती होताना दिसत नाही.उमेदवार उपलब्ध नाही, असे खोटी माहिती दाखवून राखीव अनुसूचित जमातीच्या जागांवर अन्य उमेदवारांना नोकरी दिली जाते. ज्यांच्याकडे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अद्यापही नाही व ज्यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समीतीने व उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवले आहेत, असे अनेक उमेदवार विद्यापीठात नोकरी करताना दिसतात. अशा काही उमेदवारांना अधिसंख्य करण्यात आले आहे तर अनेक उमेदवार जात प्रमाणपत्र सादर न करता सेवानिवृत्त झाले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात बहुसंख्य आदिवासी उमेदवार पदवीधर व उच्च शिक्षित आहेत. तरी चुकीच्या भरती प्रक्रियेमुळे हे उमेदवार बेरोजगार आहेत. भरती प्रक्रियेची साधी जाहीरात सुद्धा या उमेदवारांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळेच विद्यापीठात नोकरीला लागणे म्हणणे त्यांच्यासाठी खूप लांबचीच गोष्ट आहे.

आपल्या महाराष्ट्र राज्यात विविध विभागात आदिवासी समाजाच्या एकूण 11 हजार 500 जागा रिक्त करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या विविध विभागामध्ये आदिवासींच्या एकूण 55 हजार 319 जागा आहेत. आदिवासी समाजाचे अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. तरी आपल्या कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत होणा-या पदभरतीत रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक आदिवासी उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, हीच नम्र विनंती. अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेतर्फे विद्यापीठ प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनाला देण्यात आला आहे.

LIC life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय