Ghodegaon : पुणे जिल्ह्यात सामाजिक कार्य करणाऱ्या आदिम संस्कृती अभ्यास संशोधन आणि मानव विकास केंद्र, आंबेगाव या संस्थेला शिक्षण, साक्षरता, आरोग्य, संशोधन आणि रोजगार यातील विशेष योगदानासाठी प्रतिष्ठित ‘लक्ष्मी मोरेश्वर पुरस्कार – २०२४ ‘ ने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार डॉ.एम.एन. आणि लक्ष्मीबाई आगाशे मेमोरियल ट्रस्ट, सातारा यांच्यावतीने संस्थेला प्रदान करण्यात आला.
डॉ. आगाशे हे सुमारे १०० वर्षांपूर्वी सातारा येथे वैद्यक व्यवसाय करत होते. अनेक गरजूंना मोफत किंवा अत्यल्प मोबदल्यात ते वैद्यकीय सेवा देत. त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई आगाशे या पुण्यात “वैद्यकीय सहाय्यक” म्हणून शिक्षण घेत असताना त्यांचा डॉक्टरांशी विवाह झाला. मोठा परिवार सांभाळून त्यांनी समाजकार्य सुरू ठेवले. गल्लीत आजूबाजूला राहणार्या महिलांना एकत्र करून साक्षरतेचे वर्ग घेणे, स्वच्छता आणि घरगुती औषधोपचार यावर माहिती त्या देत. सातार्याच्या आजूबाजूच्या लहान गावात आणि वाड्या-वस्त्यांवर वैद्यकीय सेवा देण्यासाठी फिरती व्हॅन जात असे. त्यासोबत त्या जात आणि तिथल्या रहिवाशांना उपचार देत. (Ghodegaon)
आपल्या आजूबाजूच्या सर्वच लोकांना आरोग्य, शिक्षण मिळावे आणि कुणीच संधी पासून वंचित राहू नये यासाठी काम करणाऱ्या आपल्या आई वडिलांच्या स्मृती मध्ये आगाशे कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन एक ट्रस्ट सुरू केला. या ट्रस्ट तर्फे १९९० पासून दरवर्षी सामाजिक क्षेत्रात मूलगामी काम करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. आजवर विजयाताई लवाटे, डॉ. अनिल व सुनंदा अवचट, नसीमा हुरजूक, जीवन संस्था, मुस्लिम सत्यशोधक समाज अशा अनेक संस्था व व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेला आहे.
ट्रस्टच्या मान्यवरांसह कौशिका राजीव सरंजामे, दिप्ती गंगावणे, सरिता भट यांच्या हस्ते संस्थेचे सचिव डॉ.अमोल वाघमारे, व्यवस्थापक स्नेहल साबळे आणि सहाय्यक व्यवस्थापक आणि प्रकल्प समन्वयक समीर गारे यांना संस्थेच्या वतीने रुपये ५१ हजार च्या धनादेशासह मान्यता प्रमाणपत्र यावेळी देण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना आदिती करंदीकर यांनी आंबेगावमधील शास्वत सामाजिक बदलासाठी आणि विकासास चालना देण्यासाठी संस्थेच्या प्रभावी कार्याचे कौतुक केले. त्यांनी हे देखील अधोरेखित केले कि संस्था गरजू घटकांसोबत नाविन्यपूर्ण काम करत आहे.
यावेळी डॉ.एम.एन. आणि लक्ष्मीबाई आगाशे मेमोरियल ट्रस्ट, साताराचे पदाधिकारी सरिता भट, सुनेत्रा आगाशे, शिरीष आगाशे, प्रीती कुलकर्णी, मोहना नित्सुरे, आदिती करंदीकर, आदिम संस्थेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
(Ghodegaon)


हे ही वाचा :
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 690 जागांसाठी भरती
जुन्नर : श्रेयश कदमची राष्ट्रीय हॅण्डबॉल स्पर्धसाठी निवड
ईडीने पोर्न निर्मितीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणावर राज कुंद्राच्या घरावर छापे टाकले
PCMC : औद्योगिक गुणवत्ता स्पर्धा २०२४ मध्ये ३५ कंपन्यांतील ३०७ स्पर्धकांचा सहभाग
Cold wave : महाराष्ट्रात थंडीची लाट, पुणे 9.9°C
PCMC : भारतीय संविधान हा मानवतेचा जाहिरनामा; महापालिका आयोजित परिसंवादात वक्त्यांचा सूर