औरंगाबाद : मराठवाड्यातील स्वातंत्र्यसेनानी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आयटक कामगार नेते कॉम्रेड मनोहर टाकसाळ यांचे आज दुपारी वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. स्वातंत्र्य लढा, मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात त्यांनी अग्रणी राहून कार्य केले होते. तसेच अखेरपर्यंत ते भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटकमध्ये सक्रीय होते.
पेशाने वकील असलेले कॉ. मनोहर टाकसाळ हे मूळ बीड जिल्ह्यातील होते. त्यांचे मूळ गाव राजुरी. येथेच पिराजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याच्या लढ्यात ते ओढले गेले. याच दरम्यान त्यांच्यावर साम्यवादाचे संस्कार झाले. तेव्हापासून त्यांनी हाती धरलेला लालबावटा सोडला नाही.कष्टकरी, गरीबांच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक लढे लढले. वकील म्हणून सुद्धा त्यांनी उपेक्षितांना अनेक प्रकरणात न्याय दिला. त्यांच्या निधनाने कामगार चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
“कॉ. मनोहर टाकसाळ हे एक आदर्श कम्युनिस्ट नेते होते. डाव्या शक्तींची एकजूट त्यांना अतिशय प्रिय होती आणि ती जास्त मजबूत करण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता. कम्युनिस्ट चळवळ वाढविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर खडतर परिश्रम घेतले. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव पुरोगामी चळवळीतील सर्वच कार्यकर्त्यांना आकर्षित करायचा. एक सच्चा कम्युनिस्ट आज मराठवाड्याने आणि महाराष्ट्राने गमावला आहे.”
डॉ. अशोक ढवळे,
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष.