Thursday, March 28, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडवृक्षतोड प्रकरणी फॉरमायका कंपनीस 45 लाखाचा दंड

वृक्षतोड प्रकरणी फॉरमायका कंपनीस 45 लाखाचा दंड

पिंपरी चिंचवड : उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी येथील मे.फॉरमायका या कंपनीने कोणतीही परवानगी न घेता 90 मोठी झाडे जुलै 2022 मध्येतोडली होती. पिंपरी महापालिका कार्यक्षेत्रामध्ये महाराष्ट्र वृक्ष संरक्षण व जतन अधिनियम 1975 अमलात आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील कोणत्याही वृक्षांचा विस्तार कमी करणे, वृक्षतोड करणे, वृक्ष पुनर्रोपन करणे पालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाची परवानगी घेणे आवश्‍यक आहे.

मात्र, या कंपनीतील झाडे तोडताना संबंधितांनी कोणतीही परवानगी न घेता विविध प्रजातीचे 90 वृक्ष मुळासकट उखडून तोडले होते, आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्या ठिकाणी जेसीबी यंत्रमार्फत सपाटीकरण करण्यात आले होते.

महापालिकेच्या वृक्षगणनेच्या माहिती नुसार सदर झाडे तोडण्यात आल्याचे तपासणीत सिद्ध झाले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील अपना वतन संघटनेने याबाबत आवाज उठवून मनपाकडे कारवाईसाठी मागणी केली होती. मनपाने सॅटेलाईट इमेज मार्फत वृक्षतोडीची खात्री करून घेतली.

महापालिकेच्या उद्यान विभागाने मे.फॉरमायका कंपनीला एका वृक्षाकरिता 50 हजार रुपयांप्रमाणे 90 वृक्षांच्या दंडापोटी 45 लाख रुपयांची नोटीस बजावली होती. कंपनीचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका उद्यान विभागाने सांगितले होते. त्यानुसार आज रोजी महापालिकेने मे. फॉरमायका कंपनीवर दंडात्मक कारवाई केली. या अनुषंगाने 90 वृक्षांसाठी फॉर्माईका कंपनीकडून तब्बल 45 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

  • क्रांतिकुमार कडुलकर
संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय