पुणे : कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी असंघटित रिक्षा, टॅक्सी चालक, ट्रक चालक, यांच्यासाठी तामिळनाडूच्या धर्तीवरती कल्याणमंडळ स्थापन करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी रिक्षा चालक व त्यांच्या प्रतिनिधी सोबत चर्चा न करता एकतर्फी चुकीचा निर्णय घेतला आहे, या निर्णयामुळे रिक्षा, टॅक्सी चालक मालकांचे मोठे नुकसान होणार असून ही एक प्रकारची फसवणूक असल्याची टीका महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली आहे.
बाबा कांबळे म्हणाले की, रिक्षा, टॅक्सी चालक हा स्वयं रोजगार करणार असून त्यास कामगार म्हणता येणार नाही, रिक्षा चालकांचे सर्व कामकाज परिवहन विभाग अंतर्गत करण्यात येत असून, लायसन्स बॅच, परवाना, परिवहन विभाग देत आहे, यामुळे परिवहन विभाग अंतर्गत रिक्षा, टॅक्सी चालक मालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे अशी आमची मागणी आहे, परंतु कामगार मंत्री हसन मुश्रीफ मात्र कामगार विभाग सोडून परिवहन संबंधित असलेल्या विभागावर अतिक्रमण करत आहे.
कामगार विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या असंघटित कामगारांसाठी स्थापन झालेल्या मंडळातील कामगारांना अजून ते न्याय देऊ शकले नाही कामगार विभागाकडे यापूर्वी असलेलं घरेलू कामगार कल्याणकारी मंडळ, बांधकाम कामगार कल्याण मंडळ, सुरक्षा रक्षक मंडळ यांना न्याय देण्यास व त्यांचे प्रश्न सोडवण्यास कामगार विभाग अपयशी झालेला आहे, हसन मुश्रीफ कामगार मंत्री झाल्यापासून या घटकांचे कोणतेही प्रश्न सुटले गेले नाहीत असंघटित कामगारांना साधे सामाजिक सुरक्षा देखील देण्यात आली नाही, मग आता कामगार मंत्री हसन मुश्रीफ हे रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची घोषणा करून रिक्षा, टॅक्सी चालकांना न्याय कसा देणार, असा प्रश्न बाबा कांबळे यांनी उपस्थित आहे.
कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या या निर्णयाला आम्ही तीव्र विरोध करणार असून पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, ठाणेसह महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती कांबळे यांनी दिली.