मुंबई, दि 22 : केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य सरकारने देखील पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात कपात केली आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे.
केंद्र सरकारने काल पेट्रोलवरचा अबकारी कर 8 रुपये तर डिझेलवरचा 6 रुपयांनी कर कमी करत असल्याची घोषणा केली. यामुळे पेट्रोल ९.५ रुपये तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त होणार आहे, असे सीतारामन यांनी सांगितले. या निर्णयानंतर राज्य सरकारने देखील आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.
मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता 80 कोटी रुपये महिन्याला आणि 125 कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. 16 जून 2020 ते 4 नोव्हेंबर 2021 या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 7 रुपये 69 पैसे आणि 15 रुपये 14 पैसे प्रती लिटर कर आकारत होते. मार्च आणि मे 2020 मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे 13 आणि 16 रुपये अशी वाढ केली होती.