ओझर (रवींद्र कोल्हे) : “बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी काहीही करायला लागलं, कोणताही लढा उभा करायला लागला, किंबहुना “गनिमी कावा”पद्धतीचा अवलंब करून, लढा उभा केला जाईल, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, ना मला कधी कोणतीही निवडणूक लढवायची आहे, ना मला कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा आहे. ग्रामीण भागात “माझ्या लाडक्या बळीराजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मला तळमळीने सोडवायचा आहे” “बैलगाडा शर्यत” सुरू करण्यासाठी जर एका राजकीय व्यक्तीची राजकीय आत्महत्या होत असेल, तर याला माझी तयारी आहे. म्हणूनच ठामपणे सांगतो बैलगाडा शर्यत सुरू करणार म्हणजे करणारच आणि ग्रामीण भागात पुन्हा भिर्रर्रर्रर्रर्रर्र…. ssss…!ssss..असा आवाज लवकरच ऐकायला येईल. असा ठाम विश्वास उपस्थित गाडामालक आणि गाडा मालक संघटनांच्या प्रतिनिधींना काल आला. “कोणाला विश्वास असो वा नसो पण मी ठामपणे सांगू इच्छितो की, बैलगाडा शर्यत सुरू होणारच !आपल्या सर्वांच्या प्रेमापोटी आणि पाठिंब्यावर माझे प्रयत्न प्रामाणिकपणे सुरू आहेत. बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार आहे. बैलगाडा शर्यत बंदी उठविली नाही तर तुमच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी होऊन तुमचा आवाज दिल्ली दरबारी पोहचविणार अशा स्पष्ट शब्दात खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी बैलगाडा मालकांना धीर दिला आहे.
दरम्यान, शिरूर मतदार संघातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना ओझर येथे आयोजित करण्यात आलेल्या गाडा मालकांच्या बैठकीचे निमंत्रण स्वतः खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी दूरध्वनीद्वारे दिले होते. मात्र ते अनुपस्थित राहिले. याचा उल्लेखही खासदार डॉ.कोल्हे यांनी केला, या बैठकीला “मावळ”चे आमदार सुनील अण्णा शेळके, पुरंदरचे आमदार संजय जगताप स्थानिक आमदार अतुल बेनके विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर आणि स्थानिक राजकीय नेते, गाडा मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या दहा वर्षांपूर्वी विधिमंडळात यावर चर्चा होऊन तत्कालीन राज्यपाल यांनी यावर सही केली होती, मात्र त्या नंतर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. तेव्हापासून गाडमालक चांगलेच आक्रमक होतांना दिसत आहेत. ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना देणाऱ्या ह्या शर्यती बंद केल्याने ग्रामीण भागातील अर्थकारण कोलमडले !यात्रा हंगाम, उत्सव ही सारी मदार बैलगाडा शर्यतीवर अवलंबून होती. बैलगाडा मालक, चालक, वाजंत्री, बैलगाडा संघटनांचे प्रतिनिधी, आजी माजी आमदार, खासदार आणि जिल्हा परिषदेचे सदस्य यांची जुन्नर येथे बैठक पार पडली आहे. पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालकांनी ही बैठक आयोजित केली होती. यावेळी खासदार डॉ.कोल्हे चांगलेच आक्रमक झाले होते. ही आक्रमकता आम्ही या पूर्वी कधीही पहिली नाही. ते म्हणाले की यापूर्वीही प्रयत्न केले होते. बैलगाडा शर्यत चालू करण्यासाठी पुन्हा नव्याने प्रयत्न करावे लागणार आहे. म्हणून पशुसंवर्धन मंत्री रुपाला यांचेकडे पाठपुरावा केला आहे. त्यांना बैल या प्राण्याची संपूर्ण माहिती दिली आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान आमदार सुनील अण्णा शेळके, आमदार संजय जगताप, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांचेसह बैलगाडा आपापली भूमिका मांडली. किमान तात्पुरत्या स्वरूपात बैलगाडे आणि बैलांना सराव करण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यासाठी सरकारने उच्च न्यायालय आणि प्राणी प्रेमी संघटनांना समज द्यावी, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराही बैलगाडा मालकांनी दिला.
खासदार डॉ.अमोल कोल्हे बोलतांना म्हणाले की, गेल्या दोन अडीच वर्षांपासून शिरूर मतदार संघात मोठ्याप्रमाणावर विकास कामे झाली आहेत. पण एक महत्त्वाचं काम बाकी राहिलं आहे, ते म्हणजे “बैलगाडा शर्यत सुरू करणं. पण येत्या काळात तेही काम करणार आहे. गेल्या दोन वर्षात बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी काय प्रयत्न केले, हे तुमच्या पर्यंत पोहचविण्यासाठी या बैठकीला हजेरी लावली आहे. लवकरच पंतप्रधान मोदी यांच्याशी बैठक घेणार आहे. आजपर्यंत केलेले प्रयत्न, सर्व बाजू तुमच्या पर्यंत ठेवल्यानंतर आपण सर्वांनी योग्य तो निर्णय घ्यायचा आहे. मला ठाम विश्वास आहे की आपण सुरू केलेल्या लढ्याला निश्चितच यश येईल असा मला विश्वास आहे, असे खासदार डॉ.कोल्हे यांनी सांगितले.