Sunday, December 8, 2024
Homeकृषीराज्यातील शेतकरी संकटात; शेतक-यांना कृषी अनुदान ९० % वाढवून देण्याची मागणी

राज्यातील शेतकरी संकटात; शेतक-यांना कृषी अनुदान ९० % वाढवून देण्याची मागणी

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कृषी अनुदान ९०% पर्यंत वाढवून मिळावे, अशी मागणी सुशिलकुमार पावरा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी कृषी अधिकारी दापोली यांना दिनांक 22 जुलै 2021 रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.

कृषी अधिकारी दापोली एस.बी.खरात यांना बिरसा फायटर्स संघटनेने याबाबत निवेदन दिले. हे निवेदन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादाजी भूसे, आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी, जिल्हाधिकारी रत्नागिरी व जिल्हा कृषी अधिकारी रत्नागिरी यांना सुद्धा पाठविण्यात आली आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, वाढत्या महागाईमुळे सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भीडले आहेत. दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंचे भाव सर्वसामान्य शेतकऱ्यांना न परवडणारे आहे. राज्य शासनाकडून कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी महाडीबीटी या पोर्टलवर लॉटरी पद्धतीने निवड करून अनुदान दिले जाते. मात्र शासनाकडून मिळणारे कृषी अनुदान तुटपुंजे असल्याने ते अत्यंत कमी आहे. मात्र एकीकडे शेतकऱ्यांना लागणारे साहित्यांचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. वाढत्या महागाईमूळे सदर लाभार्थी शेतीला लागणारे कृषी साहित्य खरीदी करू शकत नाही.

अनेक तालुक्यातील शेती सिंचनाच्या सुविधा नसल्याने वरच्या पावसाच्या पाण्यावरच शेतकरी अवलंबून आहे. त्यामुळे शेतीतून मिळणारे उत्पन्न अत्यल्प आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध शेती योजनांसाठी मिळणारे अनुदान अत्यंत कमी असल्याने ते त्यांना परवडणारे नाही. त्यामुळे ज्या शेती योजनांचे अनुदान कमी आहे ते ९०% वाढवून पर्यंत देण्यात यावे.

जगात व देशात कोरोना या महामारीमुळे अनेक व्यवसाय बंद पडले. त्यामुळे अनेक लोकांना व शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. या वर्षी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे महाडीबीटी या पोर्टलवर लॉटरी पद्धतीने निवड करून दिल्या जाणाऱ्या कृषी योजनांपासून अनेक शेतकरी वंचित राहत आहे. सदर शेतकरी शेती योजनांपासून वंचित राहू नये म्हणून कृषी अनुदान ९०% वाढवून मिळणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय