Thursday, April 18, 2024
Homeविशेष लेखआईन्स्टाईन - आत्मचरित्रातील पाने

आईन्स्टाईन – आत्मचरित्रातील पाने

वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी स्वत:बद्दल लिखाण करणे म्हणजे एका प्रकारे स्वत:लाच श्रध्दांजलीच वाहणे! मी हे का लिहितो आहे? केवळ माझा मित्र डॉ. शिल्प ने सांगितले म्हणून? ( डॉ. शिल्प यांनी मूळ जर्मन आत्मकथनाचे इंग्रजीत भाषांतर केले आहे.) वस्तुत: आपल्या आजूबाजूला जी झगडणारी मंडळी असतात त्यांना, एखाद्याने स्वत:चा सतत शोध घेण्याच्या प्रक्रियेचे सिंहावलोकन कसे वाटते, हे सांगणे. आता थोडा विचार केल्यानंतर वाटते की एखाद्याचे कार्यरत आयुष्य कितीही संक्षिप्त वा मर्यादित असले, आणि चुका करण्यात तो कितीही वाकबगार असला तरीही, आजच्या सदुसष्ट वर्षाच्या माणसाचे व्यक्त करण्याजोगते विवरण पूर्वीच्या पन्नास, तीस वा वीस वर्षे वयाच्या माणसाप्रमाणे असू शकत नाही. प्रत्येक स्मृती ही आजच्या अस्तित्वाच्या रंगात रंगलेली असल्यामुळे ‘मायावी’ वाटते. तरी देखील एखाद्याच्या स्वानुभवातून दुसर्‍याच्या आत्मभानात उघड न होणार्‍या अशा अनेक गोष्टींवर प्रकाश पडू शकतो.

जरी मी अकाली प्रौढ झालेला तरुण असलो, तरी लोक आयुष्यभर जिच्यामुळे अस्वस्थ राहतात ती आशा आणि धडपड यामधे हेलकावणाऱ्या लंबकातून होणारी भली थोरली निष्फळता माझ्या वाट्याला अंमळ जास्तच जोमाने आली. मात्र त्या काळी या गोष्टींच्या अस्वस्थ पाठपुराव्यामागील क्रूरता ही ढोंगीपणा आणि चमकणाऱ्या शब्दांच्या कोंदणात आताच्या मानाने फार बेमालूमपणे लपवली जात होती, हे माझ्या लगेच लक्षात आले.

केवळ पोटासाठी या शर्यतीत प्रत्येक जण मनाविरुध्द ओढला जात असतो. भरीस भर म्हणजे या शर्यतीत धावण्यामुळे पोटपूजा निश्चितच होऊ शकते, मात्र स्वतंत्र विचार करू शकणाऱ्या संवेदनशील माणसाचे मन समाधानी राहत नाही. यावर औषध म्हणून पारंपरिक शिक्षण यंत्रणेतून प्रत्येक बालकाच्या मनावर धर्म बिंबवला जातो. फलस्वरुप मी जरी निधर्मी ज्यू आई वडीलांचा मुलगा होतो तरीदेखील धार्मिकतेच्या विवरात खोलवर खेचला गेलो. अर्थात ही धार्मिकता वयाच्या केवळ बाराव्या वर्षापर्यंतच टिकू शकली. लोकप्रिय वैज्ञानिकांच्या पुस्तकांच्या वाचनातून मला, बायबल मधील बर्‍याच कथा खर्‍या असणे अशक्य आहे, हे ठामपणे समजत गेले. त्याचा परिणाम म्हणून सकारात्मक ओजस्वी मुक्त विचारांची एक घुसळण तर तयार झालीच, आणि त्याच बरोबर व्यवस्था तरुणांना भ्रामक कल्पनांमध्ये गुंतवून त्यांची दिशाभूल करते हा मनावर कायमचा ठसादेखील उमटला. स्वानुभवातून आणि सूक्ष्म विचारातून प्रत्येक अधिकारक्षेत्राबद्दल संशय निर्माण होऊ लागला. आणि त्या सामाजिक भवतालात मा‍झ्यामध्ये कधीही पुसली न जाणारी संशयी वृत्ती तयार झाली. अर्थात कालांतराने कार्यकारणभावाची शृंखला माझ्या ध्यानात येत गेली आणि त्यामुळे माझ्या संशयी वृत्तीचे टोक बोथट होत गेले.

जे तारुण्यसुलभ धार्मिक नंदनवन आपण हरवले, ती आपल्या इच्छा, आकांक्षा आणि आदिम भावनांनी वेढलेल्या वैयक्तिक अस्तित्वाला बांधून ठेवणार्‍या एका दीर्घ व्यक्तिगत शृंखलेची पहिली पायरी होती. या सर्वापलीकडे एक सापडण्याजोगे, तपासता व अभ्यासता येईल असे सर्व प्राणिमात्रांपासून स्वतंत्र, आपल्यासमोर एका शाश्वत महाकोड्याप्रमाणे उभे ठाकणारे प्रचंड विश्व आहे. या विश्वाचा विचार मला एखाद्या मुक्तीच्या जाणि‍वेसारखा सुखावत होता. मला लवकरच हे ही उमजले की मी ज्यांचा आदर व प्रशंसा करीत होतो, अशा बहुतांश लोक आपल्या आंतरिक मुक्तीची व सुरक्षिततेची भावना या महाकोड्याला समर्पित करून त्याच्याच ध्यासात जगत आहेत. अशा मानवप्राण्येतर विश्वाचा ध्यास उपलब्ध शक्यतांच्या चौकटीत, जाणीवपूर्वक वा अजाणतेपणी, माझ्या चित्तचक्षुंसमोर परमोच्च महत्वाकांक्षेप्रमाणे तरळू लागला. अशा प्रकारे प्रेरित झालेले वर्तमान व भूतकाळातील लोक आणि त्यांनी कमावलेली अंतर्दृष्टी हेच माझे कधीही सोडून न जाणारे मित्र बनले. या नंदनवनाकडे जाणारा रस्ता धार्मिक नंदनवनाकडे जाणाऱ्या रस्त्याइतका साधा, सोपा किंवा सरळ नव्हता. पण तो विश्वसनीय सिद्ध झालेला असल्यामुळे त्याच्या निवडीबद्दल मला कधीही पश्चाताप झाला नाही.

एखाद्या गुंतागुंतीच्या गोष्टीचे चित्र अल्प रंगरेषांनी साकारावे त्याप्रमाणे मी वर जे सांगितले आहे ते अत्यंत मर्यादित अर्थाने, आणि एका विशिष्ट समजुतीच्या चौकटीने बद्ध असेच सत्य आहे. शिस्तबद्ध विचारात आनंद मानणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत त्याच्या स्वभावाचा तोच पैलू इतरांच्या तुलनेत अधिक विकसित होत राहील, आणि तिची मनोवृत्ती वाढत्या प्रमाणात त्याच पद्धतीने, इतर पैलू काहीसे दुर्लक्षून, सुनिश्चित होत राहील, हे पटण्यासारखे आहे. वरील संदर्भात त्या व्यक्तीच्या पूर्वायुष्याचा आढावा घेताना असे वाटू शकेल, की तिची वाढ एकसारखी, आणि शिस्तबद्ध रित्या झाली आहे. पण ती खरे तर ती शोभादर्शकाप्रमाणे बहुरंगी बहुढंगी पद्धतीने त्या त्या विशिष्ट परिस्थितीत घडून येत असते. बाह्य परिस्थितीतील अनेकविधता व क्षणभरात चमकून गेलेल्या जाणीवांच्या मर्यादा व संकुचितपणा प्रत्येक मनुष्याचे आयुष्य सूक्ष्म कणरुपात विभागतात. मा‍झ्या स्वभावानुसार हळुहळू क्षणिक आणि व्यक्तिगत गोष्टीतील मनाचा रस आपोआप कमालीचा कमी होऊन तो गोष्टींची उकल करण्याकडे वळणे, हे माझ्या आयुष्याला मिळालेले नवे निर्णायक वळण होते. या दृष्टीने पाहता वरील रूपरेषात्मक कथन म्हणजे हे धाडसपूर्वक जितके शक्य होते तितके अंतर्भूत करण्याचा प्रयत्न होय. याचा अर्थ असा होतो की वरील विवेचनातील विश्लेषणात देखील नेमक्या शब्दांमधे जे मांडता येते तेवढ्या आशयाइतकेच सत्य दडून आहे.

विचारप्रक्रिया म्हणजे नेमके काय? संवेदनांची परिणती स्मरणचित्रात होते, पण ती काही विचारप्रक्रिया नव्हे. अशा स्मरणचित्रांची एक श्रृंखला एका पाठोपाठ एक येत राहते, जुडलेल्या नव्या स्मरणांना साद घालते, तरीही ती विचारप्रक्रिया नव्हे. एखाद्या चित्रातून अशा अनेक चित्रमालिका तयार होतात – अगदी त्यांच्या पुनरावृत्तीतून देखील- तेव्हा ते चित्र त्या मालिकेचा मूल भाव, आणि क्रमबंधक बनते. म्हणजे मुळात एकमेकांशी असंबद्ध असणाऱ्या चित्रमालिकांना ते जोडते. हा भाव एक साधन, एक संकल्पना बनतो. मला वाटते की संकल्पनाच मुक्त साहचर्य आणि अबोध स्वप्नांचे रुपांतरण विचारप्रक्रियेमध्ये करण्यात मुख्य भूमिका बजावतात. संकल्पना ही संवेदनेमधील जाणीव किंवा पुनर्निर्मिति असायलाच हवी अशी गरज नाही. मात्र जेव्हा तसे घडते तेव्हा वस्तुत: विचारप्रक्रिया स्पष्टपणे शब्दरूप घेऊ शकते.

एखादा वाचक असेही विचारू शकेल की, हा माणूस , इतक्या क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या क्षेत्रामध्ये आपल्या कल्पनांना इतक्या बिनधास्तपणे आणि बाळबोधपणे वावरू देऊन काहीही सिद्ध करण्याची तसदी घेत नव्हता? यावर माझा बचाव असा की आपल्या विचारांचे स्वरूप हे संकल्पनेशी मुक्त क्रीडा अशा स्वरुपाचे असते. या क्रीडेच्या साह्याने अनुभूतींचे पुनरावलोकन आपण काही प्रमाणात आत्मसात करू शकतो, हेच या क्रीडेचे समर्थन होय. मात्र ‘सत्या‘ ची संकल्पना या आकृतीबंधाला अद्याप लावता येत नाही. मा‍झ्या मते या ‘ सत्य ‘ संकल्पनेपर्यंत पोचण्यासाठी, संबंधित घटक आणि त्यांच्या खेळांचे नियम यांची दीर्घकालीन मान्यता, संकेत, आपल्या हातात असायला हवी.

विचारप्रक्रियेतील बराच भाग अभावितपणे, आणि शब्द न वापरताच लक्षणीय प्रमाणात सुरु असतो या बाबतीत मला बिलकुल संदेह नाही. तसे नसेल तर आपण अगदी उत्स्फूर्तपणे एखाद्या अनुभवाने ‘आश्चर्यचकित’ कसे होवू? आपल्या आत ठराविक संकल्पनांचे विश्व घट्ट वसलेले असताना त्याच्या विरोधी अनुभव आल्यामुळेच हे चकित होणे घडलेले असते. हा कल्पनांचा संघर्ष अत्यंत जोरकसपणे, आणि तीव्रतेने, आपल्या विचारविश्वावर उलटा येऊन आदळतो, तेव्हाच आपण त्याचा निर्णायक अनुभव घेतो. आपल्या विचारविश्वाचा विकास एका अर्थी चकित होण्याची सलग उड्डाणेच होत.

जेव्हा मा‍झ्या वडीलांनी मला मी चार ते पाच वर्षांचा असताना होकायंत्र आणून दिले, त्यावेळी मला अशा प्रकारे चकित होण्याचा अनुभव आला. माझ्या अ-भावित विश्वातील संकल्पनांमध्ये आणि घटनाक्रमांमध्ये त्या सुईचे तशा प्रकारे वागणे अजिबात बसत नव्हते. मला अद्यापही आठवते की तो अनुभव माझ्यावर खोल ठसा उमटवणारा ठरला. प्रत्येक घटनेमागे काहीतरी खोल लपलेली गोष्ट असणार. मग मानवाच्या बालपणापासून तो जे जे पहात आलेला असतो त्या सर्वांबद्दल अशी चकित‘ होणारी प्रतिक्रिया का निर्माण होत नाही? वारा आणि पावसाबद्दल, चंद्राबद्दल किंवा चंद्र खाली पडत नाही या वस्तुस्थितीबद्दल, जिवंत व निर्जीव वस्तुतील फारकांबद्दल, काहीच आश्चर्य का वाटत नाही?

वयाच्या बाराव्या वर्षी मी दुसर्‍यांदा, अत्यंत वेगळ्या स्वरुपाच्या अनुभवाने चकित‘ झालो. शाळेच्या सुरवातीच्या वर्षांमध्ये मा‍झ्या हातात आलेल्या युक्लिडच्या समतल भूमितीच्या पुस्तकामुळे. त्यात काही प्रतिपादने आहेत. उदा. त्रिकोणाच्या शिरोलम्बांचा छेदबिंदू एकच असतो. ज्याला कसलाही पुरावा नसताना, कोणतीही शंका घेण्यास जागा राहू नये इतक्या निश्चिततेने हे प्रतिपादन सिद्ध करता येते. या सुबोधतेने आणि निश्चिततेने माझ्यावर अवर्णनीय ठसा उमटविला. असे एखादे गृहीतक पुराव्याविरहित स्वीकारणे मला अजिबात विचलित करत नव्हते. ज्यांची निश्चितता संशयास्पद वाटू शकेल अशा संकल्पना मी स्वीकारून सिद्ध करण्याचा प्रयत्न करू शकत होतो. उदा. माझ्या काकांनी, भूमितीचे पवित्र पुस्तक माझ्या हातात येण्यापूर्वी मला पायथॅगोरसचा सिद्धांत सांगितला होता. बर्‍याच प्रयत्नानंतर मी त्याची सिद्धता, त्रिकोणांच्या साम्याच्या आधारे सिद्ध करू शकलो. हे करताना काटकोन त्रिकोणाच्या भुजांचे नाते त्याच्या लघुकोनातूनच शोधावे लागते हे मला स्पष्टपणे उलगडले. पण याला सुध्दा काही प्राथमिक पुरावा असायला हवा, असे मला अजिबात वाटले नाही. तसेच जाणीवांच्या आकलनातून समोर ठाकलेल्या गोष्टी, ज्यांना पाहता व स्पर्श करता येतो, आणि भूमितीतून सिद्ध होणार्‍या गोष्टी- या दोहोंत मला वेगळेपण वाटत नव्हते. हीच प्राथमिक कल्पना अर्थात कांटच्या तत्त्वज्ञानाचा पाया किंवा ‘ अ प्रियोरी – सिंथेटिक जजमेंट्स’, की प्रत्यक्ष अनुभवाच्या वस्तु आणि त्यांचे भौमितिक संकल्पनांशी नाते ( लोखंडी गज, दोन वस्तुंमधील अंतर इ. ) देखील की ते अबोधपणे अस्तित्वात असते, या वस्तुस्थितीवर आधारित आहे.

यातून असेही सूचित होते की केवळ विचार करण्यातून आपल्याला प्रत्यक्ष अनुभवाच्या गोष्टींचे ज्ञान मिळवता येते, ते चकित करणारे आणि चुकांवर आधारित देखील असू शकते. इतकेच नव्हे तर जो कोणी हा अनुभव पहिल्यांदा घेत असेल त्याला मनुष्य इतक्या निश्चिततेला आणि शुद्धतेला केवळ विचारविश्वातून पोचू शकतो हे प्रचंड आश्चर्यजनक वाटल्यावाचून राहणार नाही.
भूमितिमध्ये हे शक्य असल्याचे सगळ्यात पहिल्यांदा ग्रीकांनी दाखवून दिले.

अल्बर्ट आईन्स्टाईन | अनु. मिलिंद इनामदार

(प्रत्यय निर्मित आईन्स्टाईन- सापेक्षता सांगणारा माणूस या नाटकाचा सुवर्ण महोत्सवी प्रयोग २ जुलै रोजी कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहात होत आहे. त्यावेळी प्रकाशित होणार्‍या स्मरणिकेतील लेख.)

मूळ लेखक – गब्रीएल इमॅन्युएल 

मराठी अनुवाद – डॉ. शरद नावरे 

दिग्दर्शन आणि भूमिका – डॉ. शरद भुथाडिया 

शनिवार, २ जुलै , संध्या. ४.३० वाजता 

केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय