बारामती : रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीने सकाळीच छापेमारी केली आहे. एक दोन नव्हे तर बारामती अॅग्रोच्या सहा ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे.सहा तासांपासून ईडीचे अधिकारी कार्यालयातील कागदपत्रांची छाननी करत आहेत. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीमुळे राष्ट्रवादीत एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे रोहित पवार यांचे काका अजित पवार हे सत्तेत आहेत. असं असतानाही ईडीने थेट पवार घराण्यातच हात घातल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं असून या छापेमारीवर रोहित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
रोहित पवार हे परदेशात गेलेले आहेत. ते परदेशात असतानाच ईडीने ही छापेमारी केली आहे. छापेमारी झाल्याचं कळल्यानंतर रोहित पवार यांनी महापुरुषांचे फोटो पोस्ट करत ट्विट केलं आहे. हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा… ज्यांनी पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला… अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल, असं सूचक ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. सध्या रोहित पवार यांच्या या ट्विटची चर्चा सुरू आहे.