मुंबई : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस राज्य सरकार कडक निर्बंध घालत आहेत. त्यातच आता प्रवासावरील निर्बंधही अधिक कडक करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यामध्ये आता दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी पुन्हा एकदा ई- पास लागणार आहे.
हा ई-पास फक्त अत्यावश्यक कारणांसाठी आंतरराज्यीय आणि आंतरजिल्हा प्रवासासाठी वापरता येणार आहे. गुरुवारी रात्रीपासूनच राज्यात निर्बंध वाढविले आहेत. ई- पाससाठी नागरिकांना https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईट वरून अर्ज करता येणार आहे. किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन पास प्राप्त करता येणार आहे. नागरिकांनी ई- पासचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थितीत करावा असे आवाहन राज्यातील पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे.