Friday, March 29, 2024
Homeजिल्हाअतिमुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर जमावबंदी, ‘ही’ आहेत प्रतिबंधात्मक क्षेत्रे

अतिमुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर जमावबंदी, ‘ही’ आहेत प्रतिबंधात्मक क्षेत्रे

पुणे : राज्यभरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पुण्यासह अनेक ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे. या काळात कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी पुणे जिल्ह्यातील काही तालुके वगळता इतर ठिकाणच्या सर्व शाळांना १६ जुलै पर्यत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या पाठोपाठ आता अनेक पर्यटन स्थळावर कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे पर्यटक आणि गिर्यारोहकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुणे जिल्ह्यातील सिंहगडासह इतर गडकिल्ले, पर्यटनस्थळांवर पर्यटनासाठी रविवारपर्यंत (दि.१७) जमावबंदी लावण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

ही आहेत प्रतिबंधात्मक क्षेत्रे

हवेली : सिंहगड, आतकरवाडी ते सिंहगड ट्रेक

मावळ : लोहगड, तिकोणा, विसापूर, तुंग किल्ले, ड्युक्सनोज, भाजे लेणी, भाजे धबधबा, दुधीवरे खिंड, पवना परिसर, राजमाची ट्रेक, किल्ले कातळदरा धबधबा, कोंढेश्वर ते ढाकबेहरी किल्ला.

मुळशी : अंधारबन ट्रेक, प्लस व्हॅली, कुंडलिका व्हॅली, दीपदरा, कोराईगड

जुन्नर : किल्ले जीवधन

वेल्हा : तोरणा, राजगड किल्ले, पानशेत धरण परिसर, मढेघाट

भोर : रायरेश्वर किल्ला

आंबेगाव : बलिवरे ते पदरवाडी, भीमाशंकर

या सगळ्या ठिकाणी कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

काय आहे आदेशात

पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या सोबतच या ठिकाणी मद्यपान, मद्यवाहतूक, मद्यविक्रीला पायबंद घालण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डीजे सिस्टीम वाजवण्यालादेखील बंदी घालण्यात आली आहे. धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात सर्व दुचाकी, तीनचाकी, चारचाकी किंवा सहाचाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई आहे.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय