Friday, April 19, 2024
Homeराष्ट्रीयद्रौपदी मुर्मू नव्या राष्ट्रपती

द्रौपदी मुर्मू नव्या राष्ट्रपती

नवी दिल्ली : भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली आहे. त्यांनी विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला. द्रौपदी मुर्मू या दुसऱ्या महिला, तर आदिवासी समाजाच्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले जात आहे. दरम्यान, विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद 24 जुलैला निवृत्त होत असून, 25 जुलैला मुर्मू यांचा शपथविधी होणार आहे.

एनडीएच्या उमेदवार असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना, बिजेडी, वायएसआर रेड्डी पक्षाचा पाठिंबा होता. विरोधी पक्षांकडून माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा उमेदवार होते. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान झाले. खासदार आणि देशभरातील विधानसभा आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 99.18 टक्के मतदान झाले होते. 719 खासदारांसह देशभरातील 4 हजारांवर आमदारांची मतमोजणी काल सकाळी सुरू झाली. पहिल्या फेरीत खासदारांच्या मतांची मोजणी झाली. द्रौपदी मुर्मू यांना 72.19 टक्के मते मिळाली. मुर्मू यांना मिळालेल्या खासदारांच्या मतांचे मूल्य 5,23,600 इतके आहे. विरोध पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना 27.81 टक्के मते मिळाली. त्यांच्या मतांचे मूल्य 145600 इतके आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत 20 राज्यांची मते मोजण्यात आली. राष्ट्रपतीपदासाठी आमदार, खासदारांच्या मतांचा 50 टक्के कोटा मिळवावा लागतो. मात्र, तिसऱ्या फेरीतच द्रौपदी मुर्मू यांनी 50 टक्क्यांपेक्षा जास्त दोनतृतीयांश मतांचा कोटा पूर्ण केला. तिसऱ्या फेरीत त्यांचा मतांचा कोटा 5,77,777 पेक्षा जास्त आहे. मुर्मू यांना तिसऱ्या फेरीनंतर एकूण 53 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली असल्यामुळे त्यांचा विजय झाल्याचे निवडणूक अधिकारी पी. सी. मोदी यांनी जाहीर केले. 10 राज्ये आणि पेंद्रशासित प्रदेशांच्या आमदारांची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

दुसऱ्या महिला राष्ट्रपती

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशातील मयुरभंज जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबात झाला. महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी काही काळ सरकारी कार्यालयात लेखनिक म्हणून काम केले. त्यानंतर शिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले.

1997 ला भाजपमध्ये प्रवेश केला. रायरंगपूर नगर पंचायतमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्या. त्यानंतर नगराध्यक्ष बनल्या. 2000 आणि 2009 ला त्या आमदार होत्या. बीजेडी-भाजप सरकारमध्ये मंत्री राहिल्या. भाजपच्या आदिवासी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर त्यांनी काम केले. 2015 ते 2021 पर्यंत त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षांत पहिल्यांदाच आदिवासी समाजातील व्यक्ती देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झाली. मुर्मू या राष्ट्रपती झाल्याचे जाहीर होताच देशाच्या विविध राज्यांत आदिवासी बांधवांनी पारंपरिक नृत्य करत एकच जल्लोष केला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय