Tuesday, April 16, 2024
Homeराजकारणमाझ्यावरील राग मुंबईवर काढू नका - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

माझ्यावरील राग मुंबईवर काढू नका – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : गुरूवारी सायंकाळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी नंतर आज माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नवीन सरकारचे अभिनंदन करत माझा राग मुंबईवर काढू नका असे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी बर्‍याच दिवसांनी पत्रकारांशी फेस टु फेस भेट घेत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक विविध मुद्यावर भाष्य केले. त्यांनी नवीन सरकारचे अभिनंदन आणि या सरकारकडून महाराष्ट्राचे भले व्हावे, ही इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, ज्यांनी हे सरकार स्थापन केले, त्यांच्या मते त्यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. हेच तर मी सांगत होतो, जर हे पूर्वीच केलं असतं तर आता अडीच वर्षे पूर्ण झाली असती, आणि जे झाले ते सन्मानाने झालं असतं. तेव्हा नकार दिला, आता असं का केलं? शिवसेनेलाच बाजूला ठेवून, शिवसेनेचाच मुख्यमंत्री असं होऊ शकत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, माझ्यावरील राग माझ्या मुंबईवर काढू नका. मुंबईच्या काळजात कट्यार घुसेल, असं करु नका. आरेचा आग्रह रेटू नका, पर्यावरणाला हानी पोहचवू नका. तिकडे वन्य जीवन आहे. आरेचा निर्णय बदलल्यामुळे दु:ख झाले. असे म्हणत आता सरकार वरती – खालती तुमचंच सरकार आहे असा टोला लगावला.

लोकशाहीचे धिंडवडे थांबवण्याची गरज आहे, ज्याने मत दिले त्याचा बाजार असा मांडला गेला तर ते चुकीचे आहे. मतदाराचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल असे म्हणत लोकशाही वाचवा, चारही स्तंभ एकत्र या पुढे या, असे आवाहन त्यांनी केले.

मी महाराष्ट्रातील तमाम जनतेचा ऋणी आहे. असं क्वचितच होत असेल की, एखादा माणूस जो अचानक आला तो पद सोडताना लोकांच्या डोळ्यात अश्रू येतात. हे अश्रू माझी मोठी ताकद आहे, असे उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय