पिंपरी चिंचवड, दि. ८ : कामगार पोल्ट्रीतील कोंबड्या आहेत काय? सरकारचा औद्योगिक सुरक्षा विभाग महिला कामगारांच्या मृत्यूला जबाबदार आहे, अशी टिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर सचिव गणेश दराडे यांनी केली आहे.
पिरंगुट येथील रासायनिक कंपनीच्या आगीत मृत्यू पावलेल्या गरीब महिला कामगारांबद्दल अतिशय दुःख व्यक्त करत माकपचे दराडे यांनी सरकारवर सडकून टिका केली.
पिरंगुटमधील रासायनिक कंपनीच्या आगीत 18 हुन जास्त गरीब महिला कामगार मृत्युमुखी कोणामुळे पडल्या. त्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये जाहीर करून सरकारने वेळ मारून नेऊ नये. कंपनी व्यवस्थापक, कामगार आयुक्त आणि औद्योगिक सुरक्षा संचालकांंवर सरकार फौजदारी कारवाई करणार आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.
तसेच दराडे म्हणाले, सरकारचे औद्योगिक सुरक्षा निरीक्षक भ्रष्ट आहेत. पैसे खाऊन खोटे सुरक्षा ऑडिट करतात. संपूर्ण देशात आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रातील कामगार कारखाने अधिनियम (१९४८), महाराष्ट्र कारखाने नियम(१९६३), हानिकारक रसायनांचे उत्पादन, साठवण, व आयात नियम (१९८९), रासायनिक अपघात (आपत्कालीन नियोजन, सुसज्जता, व प्रतिसाद) नियम (१९९६) ई प्रमुख कायद्याची पायमल्ली करून कामगारांना जबरदस्तीने काम करायला भाग पाडले जाते. महाराष्ट्र सरकारचे औद्यौगिक सुरक्षा व आरोग्य संचालक यांचे प्रमुख कर्तव्य आहे की, कारखाने अधिनियमांच्या कलमांअन्वये कामगारांच्या सुरक्षा, आरोग्य आणि कल्याणासाठी सर्व नियमाची अंमलबजावणी त्या उद्योगात कठोरपणे होते की नाही हे पहाणे, परंतु हे होताना दिसत नाही.
रासायनिक उत्पादनाच्या कारखान्यात आणि इतर उद्योगात सुरक्षा प्रणाली अभावी शेकडो कामगारांचे बळी जात आहेत. कामगारांच्या हक्कांचे आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेली सरकारी यंत्रणा भ्रष्ट आहे. हप्ते खाऊन सरकारी अधिकारी ग्रीन रिपोर्ट देतात. केंद्र आणि राज्य सरकारच्या कंत्राटीकरणाच्या धोरणामुळे मुळ मालक स्वतःचे कामगार ठेवत नाहीत. आणि स्वस्त मजूर पुरवणाऱ्या ठेकेदारामार्फत अतिशय धोकादायक कामे करून घेतात, असेही ते म्हणाले.
पुणे जिल्ह्यातील औदयोगिक वसाहतीत कामगार कायदे पाळले जात नाहीत. फक्त ४ मार्चला दरवर्षी ‘सेफ्टी डे’ चा उत्सव साजरा केला जातो. बेरोजगारी आणि नोकरीची हमी नसल्यामुळे कामगारांची अवस्था पोल्ट्रीतील कोंबड्यासारखी झाली आहे. जबरदस्तीने काम करायला भाग पाडले जात असल्याचेही ते म्हणाले.