आंबेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात भूमिहीन, गरीब कुटुंबांच्या अडचणीत वाढ झालेली आहे, या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील सुमारे ३५० श्रमिक कुटुंबांना किराणामाल असलेले जीवनावश्यक किट देण्यात आले.
कुकॉइन कंपनीच्या सहकार्याने व आदीम संस्था यांच्या स्थानिक संयोजनातुन हे सुमारे ३५० जीवनावश्यक किट वाटप करण्यात आले. या साहित्यात धान्ये, डाळी, कडधान्ये, तेल, मसाले, गूळ, शेंगदाणे असे महिनाभर पुरेल इतके साहित्य या किटमध्ये देण्यात आले.
या जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप प्रसंगी बी.डी. काळे महाविद्यालय, घोडेगावचे प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव व घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ.इंद्रजित जाधव व प्रदीप पवार यांनी या उपक्रमाचे सद्यकालीन महत्व नमूद करून हे जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल कुकॉइन कंपनीचे व स्थानिक पातळीवर सर्व संयोजन करणाऱ्या आदीम संस्थेचे अभिनंदन केले.
आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील सुमारे २५ गावातील भूमिहीन कुटुंबे व आदीम जमातीचे कातकरी आदिवासी कुटुंबे असे एकूण सुमारे ३५० कुटुंबांना हे जीवनावश्यक किट वाटप करण्यात आले. या जीवनावश्यक किट उपलब्ध व्हावे, याकरिता कुकॉइन कंपनीचे सतीश खंदारे, पंकज जाधव, मयूर चव्हाण यांनी पुढाकार घेतला.
सामाजिक कार्यकर्ते शैलेश डिखळे, विनोद शेंडे व कृष्णा बाजारे, डॉ.अमोल वाघमारे यांनी समन्वयाचे काम केले, तर स्थानिक संयोजन आदीम संस्थेचे राजू घोडे, अशोक पेकारी, अशोक जोशी, अविनाश गवारी, दत्ता गिरंगे, अनिल सुपे यांनी केले होते.