Friday, March 29, 2024
Homeराज्यथकीत शिष्यवृत्ती व स्वाधार योजनेची रक्कम विद्यार्थ्यांना त्वरित वितरित करा ; एसएफआय

थकीत शिष्यवृत्ती व स्वाधार योजनेची रक्कम विद्यार्थ्यांना त्वरित वितरित करा ; एसएफआय


मुंबई ,(ता. २८) : राज्यातील विद्यार्थ्यांची मागील व चालू शैक्षणिक वर्षाची थकीत शिष्यवृत्ती आणि स्वाधार योजनेची रक्कम त्वरित वितरीत करा. अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) महाराष्ट्र राज्य कमिटीने राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) आमदार कॉम्रेड विनोद निकोले, एसएफआयचे राज्य अध्यक्ष बालाजी कलेटवाड, राज्य सचिव रोहिदास जाधव, किसान सभेचे राज्य कौन्सिल सदस्य कॉ. किरण गहला, डॉ. आदित्य अहिरे आदींची उपस्थिती होती. आमदार कॉ. विनोद निकोले यांनी देखील शिष्यवृत्ती बाबत एक स्वतंत्र निवेदन सादर केले.

यावेळी निवेदनातील मागण्यांवर सामाजिक न्याय मंत्र्यांसोबत चर्चा झाली. स्वाधार योजनेची रक्कम नुकतीच वर्ग करण्यात आली असून शिष्यवृत्तीचे वितरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती पुढील १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येईल. असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी शिष्टमंडळास सांगितले.

मागील दोन वर्षापासून कोविड महामारीमुळे संपूर्ण देशासह आपल्या राज्यातील नागरिक त्रस्त आहेत. मागील वर्षी आणि यंदा असे दोनवेळा महामारीने थैमान घातले. यात देशात आणि महाराष्ट्रात हजारो रुग्ण मृत्युमुखी पडले. या महामारीचा अत्यंत विपरीत परिणाम सर्वच क्षेत्रावर झालेला आहे. याचे अनेक गंभीर परिणाम शैक्षणिक क्षेत्राला भोगावे लागले; आजही भोगावे लागत आहे.

                                    

या परिस्थितीत शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मागील वर्षी एका सेमिस्टरसाठी सूट देण्यात आली. अंतिम वर्ष वगळता सर्व विद्यार्थ्यांना पास करण्यात आले. परंतु पुढील वर्षात त्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नाहीत हे वास्तव आहे. तसेच तात्पुरते ऑनलाईन वर्ग भरवण्याचा पर्याय पुढे करण्यात आला. पण त्यातून सर्वच विद्यार्थ्यांना या वर्गात सहभागी होता आले नाही. मोबाईल फोन नसणे, ग्रामीण भागातील नेटवर्क समस्या, रिचार्जसाठी पैशांची कमतरता इ. असंख्य अडचणी समोर आल्या. ऑनलाईन शिक्षणातून लाखो विद्यार्थी आजही बाहेर आहेत. ज्या विद्यार्थ्यांना शुल्क वेळेवर भरता आले नाही त्यांना ऑनलाईन वर्गातून  बाहेर काढण्याचे प्रकार घडले. म्हणून सरकारने यातील सर्व समस्या सोडवून सर्व विद्यार्थ्यांना सामावून घेतले पाहिजे.

या काळात विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे वेळेवर वितरण झालेले नाही. यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षा व ट्युशन शुल्क पूर्तता वेळेवर करता आलेली नाही. शिष्यवृत्ती वेळेवर वितरीत न होण्यामागे महामारीचे कारण पुढे केले जात आहे. परंतू शिष्यवृत्ती वेळेवर न मिळणे ही दरवर्षीची समस्या आहे. हीच समस्या स्वाधार योजनेबाबत आहे. सरकारकडे याबाबत कोणतेही नियोजन नाही हेच यातून सिद्ध होते. यावर आपण गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. मागील शैक्षणिक वर्ष २०१९-२० आणि चालू शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या दोन्ही वर्षातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थकीत आहे. तसेच स्वाधार योजनेची रक्कम देखील वर्ग झालेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत.

म्हणून विद्यार्थी हित लक्षात घेऊन मागील व चालू शैक्षणिक वर्षाची थकीत शिष्यवृत्ती व स्वाधार योजनेची रक्कम पुढील १५ दिवसांत त्वरित वितरीत करावी अशी मागणी एसएफआय महारष्ट्र राज्य कमिटीने केली आहे. अन्यथा संघटनेच्या वतीने राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे निवेदनात एसएफआयने म्हटले आहे.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय