७ जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत आंदोलन
नांदेड, दि. ५ : शासकीय कोविड सेंटरमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना मार्चपासून पगार न देताच जिल्हा शल्य चिकित्सक यांनी स्टाफ नर्स व इतर कोविड कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले आहे. तीन महिन्यापासून पगार न देता कार्यमुक्त करणे, हा अत्यंत चुकीचा निर्णय असल्याने त्याचा लोकशाहीवादी युवा महासंघ (DYFI) च्या वतीने निषेध करून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे.
आज झालेल्या बैठकीमध्ये ७ जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांना योग्य उपचार मिळावा, त्यासाठी कोरोना योद्धे विविध विभागातून जीवाचे रान करत होते. त्यात सर्वात पुढे फ्रंट लाईनवर लढणारा योद्धा म्हणून आरोग्य विभागाचे कर्मचारी मात्र याच योद्ध्यांना मागील मार्च महिन्यापासून मानधन मिळाले नाही. त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांना तत्काळ मानधन देण्याची गरज असल्याचे डीवायएफआय ने म्हटले आहे.
शासकीय जिल्हा रुग्णालय आणि विष्णुपुरी येथील रुग्णालयात कर्तव्यावर असलेले आरोग्य कर्मचारी ज्यात स्टाफ नर्स व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। त्यासाठी थकलेले त्यांचे मानधन तातडीने काढण्यात यावे, अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश माचेवाड यांच्यासह स्वप्नजा जोंधळे, आरती वाघमारे, धृपदा पंदलवाड, संगीता बंदलवाड, माधवी कांबळे, निकिता बोगेवाड, सतीश वाघमारे यांनी केली आहे. अन्यथा ७ जूनपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.