Friday, March 29, 2024
Homeविशेष लेखरविवार विशेषविशेष लेख : भारताचा शोध - वास्को-द-गामा? अफानासी निकीतीन : युरोप -...

विशेष लेख : भारताचा शोध – वास्को-द-गामा? अफानासी निकीतीन : युरोप – भारत आधुनिक काळातील पहिला संबंध.. झाकळलेला इतिहास !

इतिहास सर्व गोष्टींची नोंद ठेवत असतो.. पण तो सर्वानां सारखाच न्याय देत असतो- असं मात्र नाही. काही घटना इतिहासात इतक्या रुढ होवुन जातात की त्याने दुसरया गोष्टी झाकाळल्या जावुन त्यांचं महत्वच नाहीसं होतं. हयाचं एक मुख्य कारण म्हणजे ज्यांनी इतिहास घडविला त्यांनी तो क्वचितच स्वतः लिहला, व ज्यांनी तो लिहला तो मुख्यतः सोयीचा व कधी कधी पुर्वग्रहदुषित लिहला. दुसरं एक कारण- लेखी पुरावा उपलब्ध नसणे.

असचं एका झाकाळल्या गेलेल्या इतिहासाबद्दल. युरोपियन मुख्य इतिहासधारेनुसार भारतात सागरी मार्गाने येणारा पहीला ( नोंद असलेला) युरोपिन म्हणजे पोर्तुगिज खलाशी वास्को-द-गामा, जो आजच्याच दिवशी २० मे १४९८ ला कालीकतला( आजचे कोझिकोडे)  पोहोचला. पण गामाच्या जवळपास २५ वर्षे अगोदर आणखी एक युरोपिन खलाशी-व्यापारी सागरी मार्गाने भारतात येवुन, ३ वर्षे इथं ( विशेषतः महाराष्ट्रात) राहुन, इथल्या समाजव्यवस्थेचा अभ्यास करुन गेला- तो होता रशियन व्यापारी अफानासी निकीतीन. 

मॉस्कोच्या उत्तरेस साधारण १८० किमी वर वसलेल्या त्वेर (Tver) शहराचा हा  तरुण व्यापारी १४६६ ला व्यापारी दौऱ्यावर बाहेर पडला.  व्यापाराच्या नवनव्या संध्या शोधण्यासाठी प्रवासावर निघालेल्या अफानासीच्या जहाजावर वोल्गा नदीच्या  प्रवासात मंगोलियन ततार लुटेरयांनी हल्ला केला आणि जहाज लुटले, बर्‍याचशा खलाशांची किडनॅपिंग झाली.  लूट झाली असली तरी अफानासी मातृभूमीला परत जाऊ इच्छित नव्हता. त्याने प्रवास चालू ठेवला.प्रथम वोल्गा मार्गे तो बाकु (आजरबायजानची राजधानी) पर्यंत आला. सागरी मार्गाने कॅस्पीयन समुद्र पार करुन तो पर्शियात पोहोचला. तिथे १ वर्ष राहुन त्याने व्यापार केला.  तिथेच त्याच्या डोक्यात रशिया साठी नवीन व्यापारी सागरी मार्ग शोधून काढावा  हा विचार आला.तो पर्शियन आखात व नंतर अरबी समुद्र पार करुन १४६९ च्या दरम्यान भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर त्याकाळच्या बाहमनी राज्यात पोहोचला.( आत्ताचा महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक व तेलंगणा ,पश्चिम आध्रंप्रदेश) पुढील ३ वर्षे तो इथं राहीला, फिरला, विविध शहरांना भेटी दिल्या, व्यापार केला, सामान्य लोकांच्या मिसळला,  दररोजच्या अनुभवांची आणि निरीक्षणांची नोंदी त्याने स्वतःच्या  दैनंदिनीत ठेवल्या व परतीच्या प्रवासात त्यानं भारतभेटीवरचं प्रवासवर्णन लिहलं – Хожение за три моря ( खझेनिये जा त्री मोऱ्या)- तीन समुद्रांपलीकडचा प्रवास ! 

फक्त एक प्रवासवर्णन नव्हतं तर आधुनिक काळातील कोणाही युरोपियनकडुन भारतावर लिहलं गेलेलं पहिला सामाजिक दस्ताऐवज होता, ज्याने रशियाला त्याकाळच्या भारताशी ओळख करुन दिली. अफानासीने त्याकाळच्या पश्चिम भारताच्या लोकसंख्येचा, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, सैन्य, अर्थव्यवस्था, धर्म, सामाजीक आचरण, नैसर्गिक साधनसंपत्ती, इतर बाबींचा अभ्यास करुन आपली वस्तुनिष्ट निरीक्षणे नोंदवली.  त्याखेरीज  त्या वेळच्या समाजमनातील  परंपरा,  चालीरीती , मिथकं, अंधश्रद्धा  याबद्दल देखील अफानासीने उहापोह केला आहे. भारतातील ज्या ज्या ठिकाणी त्याने भेटी दिला तेथील लोकांशी व्यवहार करताना त्याला अनेक विविध अनुभव आलेत त्याचे देखील त्याने मोहक शब्दात वर्णन केले आहे. कोणताही माणूस जेव्हा नव्या प्रदेशात जातो तेव्हा तेथील नवनवीन आणि अपरिचित  असणाऱ्या गोष्टी बघून बुचकळ्यात पडतो, काही गोष्टी बघून हादरतो; तर काही गोष्टी पाहून सुखावतो. पंधराव्या शतकातील या धाडसी व्यापारी बद्दल देखील भारतात तेच घडले. त्याचं आश्चर्य, राग, जिज्ञासा, किळस, भीती इत्यादी त्याने स्वतःच्या लिखाणात लपविले नाही. त्याच्या ग्रंथातील सांस्कृतिक भान हे मुळापासून वाचायला हवे. त्याच्या वास्तव्यातील एक गंमतीशीर गोष्ट अशी घडली की स्वतःचा घोडा तो एका व्यवहारात हरवून बसला. 

पुढे त्या काळचा सामाजिक- सांस्कृतिक भारत समजण्यासाठी अनेक संशोधकांना ह्या प्रवासवर्णनाचा उपयोग झाला.  तसेच सोळाव्या-सतराव्या शतकातील  खलाशांना देखील आशिया मध्ये  समुद्रामार्गे प्रवास करण्यासाठी या लिखाणाचा  उपयोग झाला. अफानासीच्या अगोदर देखील रशियामध्ये भारतावर विविध लिखाण झालं होतं परंतु त्याचं लिखाण हे पहिलं वस्तुनिष्ठ लिखाण ठरलं. भारताबद्दल लिहिल्या गेलेल्या बऱ्याचशा ऐतिहासिक कादंबऱ्याचा आधार  हे प्रवासवर्णन ठरले. तसेच  इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात  देखील  त्याचा उपयोग करून घेण्यात आला. पुढे त्यावर १९५८ साली त्याच नावाचा (хождение за три моря) चित्रपट सोवियत रशियात काढण्यात आला. या चित्रपटामुळे  सामान्य रशियन आणि भारतीय लोकांना देखील अफानासीच्या प्रवासाबद्दल सविस्तर माहिती झाली. ज्या काळात प्रवासाचे तंत्रज्ञान इतके विकसित नसतानादेखील, स्वतःचा जीव धोक्यात घालून तीन समुद्रांचा प्रवास पार करून  अनोख्या प्रदेशात, अनोख्या समाजात वावरून, त्याच्या विविधांगी घटकांचे वस्तुनिष्ठ निरीक्षण करून  त्यावर सुंदर प्रवासवर्णनात्मक ग्रंथ लिहिणारा हा धाडसी महत्वकांशी व्यापारी! त्याच्या लेखन शैली चे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याकाळी  प्रचलित असलेल्या आणि रशियन चर्चच्या प्रभावाखाली वाढलेल्या   बोजड, क्लिष्ट रशियन भाषेत लिखाण न करता अफानासिने स्वतःची एक साधी सरळ शैली जोपासली. त्याच्या या लिखाण शैलीमुळे  रशियन  भाषा विकासात देखील मोलाची  भर पडली. प्रवासवर्णनतील काही नोंदी या अरेबिक आणि पर्शियन भाषेत देखील आहेत. अशा प्रकारची दर्यावर्दी सफर करणारा अफानासि हा रशियाचा पहिला व्यापारी ठरला. विशेष म्हणजे ज्या वेळी तो घरातून  व्यापार  डोक्यात घेऊन बाहेर पडला होता त्या वेळी पुढे आपण पर्शिया व भारताचा दौरा करायचे असे काही ठरवले नव्हते. त्याचे रूढार्थाने काही शिक्षण झाले नव्हते की त्याला कुठल्या परकीय भाषा अवगत नव्हत्या ( त्याने त्याच्या वास्तव्या दरम्यान स्वतः शिकल्या) की कुठलीही राजकीय  डिप्लोमसीची कलाअवगत होती. तरीदेखील संपूर्ण प्रवासात आणि भारतातील वास्तव्यात स्वतःच्या हुशारी व शहाणपणाच्या जोरावर त्याने केवळ स्वतःला जिवंत ठेवले नाही तर व्यापार देखील केला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सांस्कृतिक संचित प्रवासवर्णनाच्या रूपाने एकत्रित करून पुढील काळात दोन देशातील संबंध सुदृढ होण्यासाठी मोलाची भर टाकली.

पण बिचारा आफानासी त्याच्या नेटीव्ह शहरी परत पोहचू शकला नाही. इतका काळ बाहेरील अनोळख्या प्रदेशात राहून देखील त्याला स्वतःच्या मातृभूमीची ओढ लागून राहिली होती. परतीचा प्रवास  सागरी मार्गाने पूर्ण करून तो रशियात पोहोचला देखील परंतु , त्याच्या  नेटिव्ह त्वेरपासुन जवळ असलेल्या स्मोलेन्सक शहरात १४७५ साली त्याचा मृत्यु झाला. भारत भेटीवर असताना १९५५ मध्ये निकीता ख्रुश्चेवना नेहरुंनी विचारलं होतं, भारताला भेट देणाऱ्या पहील्या रशियन माणसाची तुम्ही दखल घेतली आहे का? यावर रशियामध्ये त्याच्या नेटीव्ह शहरात- त्वेरमध्ये- निकीतान अफानासीचं स्टॅच्यु बांधुन घेण्यात आलं, जे आजही तिथं आहे. शहरवासीयांना या स्मारकाचा विशेष अभिमान आहे.  हे स्मारक शहरातील एक प्रमुख  पर्यटन आकर्षण आहे जिथे  जगभरातून अनेक पर्यटक भेट देतात. वास्को-द-गामा ने शोधलेल्या सागरी मार्गामुळे भारता वरच्या युरोपियन सत्तांच्या साम्राज्यवादाची सुरुवात झाली . पण निकितान अफानासी ने दिलेल्या  भेटीमुळे त्यावेळेचा सांस्कृतिक भारत युरोपात पोहोचला. पंधराव्या शतकातच दैनंदिनी स्वरूपात लिहिलेल्या या प्रवासवर्णनाचा समावेश मॉस्को दरबारी असणाऱ्या  इतिवृत्तामध्ये केला गेला होता. रशियन राज्यसत्तेचा आद्य इतिहासकार निकोलाय कारामजिन याने आधुनिक काळात आफानासीच्या  प्रवासवर्णनाची नोंद घेतली. पुढे अनेक युरोपियन संशोधकांनी आफानासी ने भारतावर लिहिलेल्या पुस्तकाचा उपयोग स्वतःच्या संशोधनात केला.  रशियन वांग्मयात देखील या पुस्तकाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. रशियन साहित्याच्या विद्यार्थ्याला हे पुस्तक आवर्जून अभ्यासावे लागते.

जवळपास एक ५०० वर्षांनी आफानासीच्या हया योगदानाची परतफेड एका  कोल्हापुरकराने रशियावर एक जबरदस्त पुस्तक लिहुन केली – ‘रशिया : नव्या दिशांचे आमंत्रण’- त्यांचं नावं आहे ज्ञानेश्वर मुळे ! भारताचे रशियातील राजदुत असताना ३ वर्षांच्या अनुभवावर व प्रचंड अभ्यासावर बदलत्या रशियाचे ( सोवियत काळातील व त्याचा पतनानंतरचा काळ) सुंदर चित्र रेखाटले आहे- ज्याला खरचं तोड नाही ! ज्याला रशिया समजुन घ्यायचा आहे, त्याने जरुर हे पुस्तक वाचावं. अर्थातच, मुळेंनी पुस्तक अर्पन केलेलं आहे आफानासीला- ते खालील शब्दांसहीत,

‘या रशियन माणसाने पंधराव्या शतकात रशियन जनतेला महाराष्ट्रसह भारत समजावून सांगितला. दख्खनच्या पठारावर जवळजवळ तीन वर्षे संचार केला . जुन्नरपासून बिदरपर्यंत आणी दाभोळपासून गोवळकोंड्यापर्यंत अनेक स्थळांना भेटी दिल्या. युध्दाला नव्हे तर व्यापाराला आला व आपला घोडाही जुन्नरमध्ये गमावून बसला. सहा शतकानंतर ही छोटी परतफेड…’

– इर्शाद वडगांवकर, कोल्हापूर

[email protected]

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय