Thursday, July 18, 2024
Homeजिल्हाआदिवासींचा विकास हाच काँग्रेसचा ध्यास : राज्य महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

आदिवासींचा विकास हाच काँग्रेसचा ध्यास : राज्य महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

नाशिक / सुशिल कुवर : राज्यातील आदिवासींना कॉंग्रेसने भरभरून दिले असून तेवढेच प्रेम केले व करतही आहे. जेव्हा जेव्हा कॉंग्रेस पक्ष अडचणीत होता, तेव्हा आदिवासींनीच कॉंग्रेसला ताकद देण्याचे काम केले आहे.

इंदिरा गांधी, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांचाही आदिवासींचा विकास हाच ध्यास कायम राहिला आहे. आदिवासींच्या प्रश्नांबाबत पक्षाकडून ज्या उणीवा राहिल्या आहेत त्या दूर करून, आदिवासींच्या पाठीमागे कॉंग्रेस ताकदीनिशी उभा राहील. आदिवासींच्या प्रलंबित सर्व प्रश्नांसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे बैठक आयोजीत करून सर्व प्रश्नांवर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे येथील गायकवाड सभागृहात आयोजीत राज्यस्तरीय आदिवासी मेळाव्याचे रविवारी (दि.५) महसूलमंत्री थोरात यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार हिरामण खोसकर, माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, वत्सला खैरे, आयोजक नगरसेवक राहुल आहेर, लक्ष्मण जाधव, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड विनायक माळेकर, आशा तडवी आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, आदिवासी बांधवांवर स्व.इंदिरा गांधी यांच्यापासून काँग्रेस पक्ष प्रेम करत आहे. हीच परंपरा पुढे सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी चालविली आहे. यामुळेच आदिवासींवर जीवापाड प्रेम करणाऱ्या कॉंग्रेसच्या प्रचाराचा नारळ नेहमी नंदुरबार येथून फोडला जातो. याची आठवण करून देत ते म्हणाले, आदिवासींना त्यांच्या मुळ जमिनी परत देण्याचा ऐतिहासिक निर्णय असो की, आदिवासींसाठी स्वतंत्र ९ टक्के बजेटची तरतूद, घरे, शैक्षणिक फी यांसह विविध योजना या कॉंग्रेसच्याच काळात झाल्या आहेत.

समाजाचा सर्वागिण विकास व्हावा, यासाठी पक्षाकडून प्रयत्न झाला व होत आहे. मात्र, अद्यापही पूर्ण विकास साधता आलेला नसल्याचे त्यांनी यावेळी मान्य केले. बोगस आदिवासी, खावटी योजना आदी समाजाचे प्रलंबित प्रश्न यावेळी मांडण्यात आले आहे. त्यावर बोलताना हे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.

राज्यघटनेतून आदिवासी समाजाला पाहिजे तो न्याय मिळालेला नाही. बोगस आदिवासींचा मोठा प्रश्न आहे. आदिवासींचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. काँग्रेस पक्षाकडून आदिवासींकडे दुर्लक्ष झाले असल्याची खंत माजीमंत्री शिवाजी मोघे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, आदिवासी समाज काँग्रेसपक्षावर का नाराज आहे याची कारणे शोधून त्या दूर कराव्यात, अशी मागणी केली.

या मेळाव्यास प्रदेश पदाधिकारी राजाराम पानगव्हाणे, भारत टाकेकर, अ‍ॅड. संदीप गुळवे, प्रसाद हिरे, सुरेश मारू, वसंत ठाकूर, ज्ञानेश्वर काळे, जनार्दन माळी, सुनील आव्हाड, निलेश खैरे आदी उपस्थित होते. प्रारंभी आदिवासींची नृत्य सादर करण्यात आली. समाजातील विशेष कामगिरी करणाऱ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रस्ताविक लक्ष्मण जाधव यांनी केले तर, राहुल दिवे यांनी आभार मानले.

खऱ्या आदिवासींना न्याय देण्याची ग्वाही

सध्या बोगस आदिवासींचा मुद्दा ऐरणीवर आहे. बोगस आदिवासींना काढून खऱ्या आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका अनेकदा मांडली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे लवकरच बैठक घेऊन, हा निर्णय मार्गी लावण्यासाठी आपण बांधील आहे, अशी ग्वाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय