Wednesday, April 24, 2024
HomeNewsकोट्यावधी रुपयांचा खर्च तरीही इंद्रायणी पुन्हा फेसाळली

कोट्यावधी रुपयांचा खर्च तरीही इंद्रायणी पुन्हा फेसाळली

शहरातील नद्या केंद्र सरकारच्या ताब्यात द्याव्यात

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर

दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर इंद्रायणी नदीच्या पाण्याचे प्रदूषण वाढत आहे.पिंपरी चिंचवड शहरातील औद्योगिक रसायन मिश्रित सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते पाणी नदीत सोडले जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून तळवडे,चिखली,तसेच तसेच इंद्रायणी नदीकाठच्या गावातून मैलामिश्रित रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीच्या पात्रात सोडले जाते. त्यामुळे 8 जुलै 2022 व 15 ऑक्टोबर 2022 या दिवशी इंद्रायणी नदी रासायनिक फेसाने पांढरी शुभ्र दिसत होती.आता पुन्हा इंद्रायणीच्या पाणी फेसाळले आहे.मोशी,डूडूळ परिसरात दुर्गंधी युक्त वास पसरला आहे.


एकीकडे पिंपरी-चिंचवड शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी इंद्रायणी शुद्धीकरण प्रकल्पावर अब्जावधी रुपये खर्च करूनही प्रदूषण रोखण्यात प्रशासनाला अपयश आलेले आहे.पाण्यामधील ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्यामुळे येथील जलचर जीवचक्र नष्टा होवून इंद्रायणी कायमची मृत होईल.मुंबईच्या मिठी नदीची अवस्था अशीच झाली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहोळा काळात इंद्रायणीच्या पाण्याचे आचमन वारकऱ्यांनी करू नये,अशा स्पष्ट सूचना 20 जून 2022 रोजी पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिल्या होत्या.
सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते पाणी तसेच नदीत सोडले जात असल्याने नदीला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.हेच पाणी आळंदी येथे पिण्यासाठी वापरले जाते,वारकरी त्याच पाण्याने आंघोळ करत आहेत.


इंद्रायणी,पवना असो वा अन्य कोणतीही नदी असो ‘या सर्व गोष्टी आपल्या आहेत आणि आपल्याकरता राष्ट्रीय संपत्ती आहेत’, ही भावना जोपर्यंत लोकांच्या अंतर्मनात रुजत नाही, तोपर्यंत ‘नद्या स्वच्छता अभियान’ कितीही राबवले, तरी काहीही भेद जाणवणार नाही, हेच सत्य आहे.
गेल्या काही महिन्यांपासून रासायनिक मिश्रणाने इंद्रायणी नदी वारंवार फेसाळली जात आहे. परिणामी दिवसेंदिवस प्रदूषण वाढत चालल्याने जलचर प्राण्यांना फटका बसत आहे.तसेच नदीकाठची शेती प्रदूषित पाण्यामुळे धोक्‍यात आली आहे.


साथीचे रोग जंतू संसर्ग आजार
आळंदीसह नदीकाठच्या गावांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.जलपर्णी वाढत आहे. उद्योगनगरीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून प्रकल्प उभारले आहेत. उभारलेले प्रकल्प चालवण्यासाठी वर्षाला कोट्यवधीचा खर्च केला जातो.तरीही सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते पाणी तसेच नदीत सोडले जात असल्याने नदीला गटाराचे स्वरुप आले आहे. विशेष म्हणजे वारंवार प्रशासनाकडे इंद्रायणी प्रदूषण मुक्‍त करण्याची मागणी करूनही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.

गोड पाण्याची पूर्णतः वाट लागली आहे

1980 ते 1990 या काळात इंद्रायणीचे पाणी अतिशय शुद्ध होते.तळवडे,चिखली,मोशी ई काठावरील गावे त्यावेळी महापालिकेत नव्हती.त्यानंतर उद्योगांचे व लोकवस्तीचे प्रमाण वाढून मैलामिश्रित रसायन युक्त पाणी ओढा,नाल्यातून सरसकट इंद्रायणीत सोडले जाऊ लागले.
शहरांच्या सांडपाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे रोगजंतू,मच्छर वाढू लागले.नदीकाठची गावे,शहरामध्ये साथीचे व जंतू संसर्ग आजार शहरात दहा वर्षांपासून ठाण मांडून बसले आहेत.शहरातील संपूर्ण सांडपाणी एका मोठ्या शुद्धीकरण प्रकल्पाद्वारे एकत्र करून वेगळ्या पाईप लाईन द्वारे शेती व उद्योगाला पुनर्वापरासाठी दिले पाहिजे.

भूजल साठ्यात प्रदूषण होण्याचा मोठा धोका

पवना व इंद्रायणी या दोन पवित्र नद्यांच्या दूषित पाण्यामुळे भूगर्भातील जलसाठा प्रदूषित होईल.त्यामुळे नदीकाठच्या वीस किलोमीटर दोन्ही बाजूला भूगर्भ व भूचर जीव,वनस्पती,नैसर्गिक माती नष्ट होईल.अशीच अवस्था मुंबईच्या मिठी नदीची झाली.राडा रोडा,आसपासचा मैला,सांडपाणी यामुळे मिठी नदीचे पात्र अरुंद झाले.2005 साली या नदीने पावसात रौद्र रूप घेतले आणि मुंबईत पुराचा हाहाकार होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते.
मागील काही वर्षात इंद्रायणी,पवनेच्या पात्राने महापुरात शहराच्या आजूबाजूच्या परिसरात पाणलोट विस्तार करून संभाव्य धोक्याचा इशारा दिला आहे.

शहरातील नद्या केंद्र सरकारच्या ताब्यात द्याव्यात

राज्यसरकार,प्रदूषण नियंत्रण महामंडळ,मनपा यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत.देशातील जंगल संपदेची देखभाल,संरक्षण करण्यासाठी भारत सरकारचे वनखाते कठोरपणे काम करत आहे.त्यामुळे ग्रीन इंडिया,पश्चिम घाट सारखे वन संरक्षण प्रकल्प यशस्वी होत आहेत.इंद्रायणी,पवना हे निसर्गाचे वरदान आहे.ही जलसंपदा बेवारशी आहे.तिची जपणूक करण्यासाठी नदी प्रदूषण नियंत्रण किंवा शुद्धीकरण प्रकल्प मनपाच्या ताब्यातून काढून घेतले पाहिजेत.केंद्रीय जल संपदा संवर्धन खात्यामार्फत इंद्रायणी व पवना यांचे संवर्धन केले पाहिजे.राडा रोडा व रसायने,मैला मिश्रित पाणी नदीत प्रक्रिया न करता सोडणाऱ्या उद्योग,मनपाला दंडनीय अपराधासाठी फौजदारी गुन्ह्या खाली बेड्या ठोकणारे कायदे संसदेत संमत करावे लागतील तेव्हाच गोड पाण्याच्या नद्या मानवी संस्कृतीच्या इतिहासाला नवे वळण देतील.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय