आळंदी / अर्जुन मेदनकर : श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात अग्रभागी असणाऱ्या देवाच्या व स्वाराच्या अश्वांचे प्रस्थान अंकली जि बेळगांव येथून आज ( बुधवार ) झाले . वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह भ प विठ्ठल महाराज पाटील यांच्या हस्ते या अश्वांचे पूजन करण्यात आले . संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या आळंदी ते पंढरपूर या पालखी सोहळ्यात मानाचे स्थान असलेल्या माऊलींच्या अश्वाचे आज निर्जला एकादशीदिवशी शितोळे- अंकली (ता. चिकोडी जि . बेळगांव ) येथून प्रस्थान झाले . हे अश्व अंकली ते आळंदी हा पायी प्रवास करुन दि. १० जून रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आळंदीत दाखल होतील .
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/05/IMG-20230531-WA0014-2-1024x1024.jpg)
या प्रस्थान सोहळ्यास श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार ,महादजीराजे शितोळे सरकार , युवराज विहानराजे शितोळे सरकार, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब अरफळकर, अजित परकाळे, निवृत्ती चव्हाण, माऊली गुळुजकर आदीसह वारकरी उपस्थित होते . सन १८३२ मध्ये श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा सुरु झाला तेंव्हापासून श्रीमंत शितोळे सरकार यांचे अश्व व देवाला रात्री मुक्कामाचे ठिकाणी तंबू देण्याची परंपरा आहे.२९ जून रोजी आषाढी एकादशी आहे.अंकली येथील शितोळे सरकारांच्या राजवाड्यात अश्वांचे पूजन वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल महाराज पाटील यांच्या हस्ते झाले.पूजनानंतर नगर प्रदक्षिणा झाल्यावर या अश्वाचे आळंदीकडे प्रस्थान झाले.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/05/IMG-20230531-WA0013-2-1024x768.jpg)
अश्वांचा प्रवास मार्ग
३१ मे रोजी मिरज, १ जून रोजी सांगलवाडी, २ जून रोजी इस्लामपूर पेठनाका, ३ जून रोजी वहागाव, ४ जून रोजी भरतगाव, ५ जून रोजी भुईंज, ६ जून रोजी सारोळा, ७ जून रोजी शिंदेवाडी, ८ व ९ जून रोजी पुणे व दि.१० जून रोजी आळंदी असा पायी प्रवास असल्याचे श्रीमंत सरदार महादजीराजे शितोळे सरकार अंकलीकर यांनी सांगितले.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/05/IMG-20230531-WA0009-3.jpg)
अश्वांची परंपरा
माऊलींच्या पालखी सोहळ्यात ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या रथापुढे जो अश्व चालत असतो तो माऊलींचा अश्व. दुसरा अश्व ज्यावर जरिपटका घेऊन अश्वस्वार असतो तो स्वाराचा अश्व असे हे दोन अश्व असतात. या अश्वांची मानाची परंपरा कर्नाटकातील अंकली येथील शितोळेराजे यांच्याकडे आहे. सध्या ही परंपरा ऊर्जितसिंहराजे शितोळे हे चालवत आहेत. हे दोन्ही अश्व सोहळ्यात सामील होण्यासाठी पायी अंकली येथून आळंदी येथे दाखल होतात.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/05/IMG-20230531-WA0008_1685540413430-2-1021x1024.jpg)
शितोळे घराण्याचा राजाश्रय
१८३२ मध्ये हैबतबाबा आरफळकर यांनी माऊलीचा पालखी सोहळा सुरू केला तेव्हा शितोळे सरकारांनी या सोहळ्यास राजाश्रय दिला. त्यानुसार शितोळे सरकारांच्या तंबूत माऊलींच्या पादुकांचा मुक्काम, नैवेद्य, समाज आरतीसाठी उपस्थिती, वारीतील न्याय निवाडा शितोळे सरकारांच्या ध्वजाखाली होणे असा रितीरिवाज कायम आहेत. सोहळ्यात रोज पहाटे ४ वाजता अश्वास निमंत्रण द्यायला चोपदार जातात व त्यानंतर साडेपाच वाजता हा अश्व दर्शनासाठी माऊलींच्या पादुकांजवळ येतो. त्यावेळी त्याच्या गळ्यात पुष्पहार घातला जातो. तिथून तो पुढे चालण्यास मार्गस्थ होतो.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/05/IMG-20230531-WA0007-2-913x1024.jpg)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/05/IMG-20230529-WA0004-12-1013x1024.jpg)