पूर्णा : पूर्णा शहरातील शासकीय ग्रामीण रुग्णालय शहराच्या बाहेर असून शहरातील बहुतांश नागरिकांची गैरसोय होत असल्याने डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवक संघटनेने पूर्णा शहरातील सराफा बाजाराच्या पाठीमागे असलेल्या जुन्या शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणी एक अतिरिक्त रुग्ण तपासणी केंद्र (ओ.पी.डी) सुरू करण्याची मागणी केली आहे.
पूर्णा शहरात पूर्वी सराफा बाजाराच्या पाठीमागे शासकीय रुग्णालय होते. परंतु ते रुग्णालय काही वर्षांपूर्वी पूर्णपणे बंद झालेले असून शहराच्या बाहेर पूर्व दिशेला काही वर्षांपूर्वी शासकीय ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले. हे रुग्णालय बरेच दूर असल्याने नागरीकांची गैरसोय होत आहे. विशेष करून शहराच्या पूर्व दिशेला व मध्यभागात असलेल्या नागरिकांना जवळपास ४ ते ५ किलोमीटर एवढे अंतर आजारपणात परवडण्याजोगे नाही. खास करून आपात्कालीन रुग्णांसाठी. शहरातील बहुतांश नागरिक हे आर्थिकदृष्ट्या मागास असल्यामुळे त्यांना खाजगी दवाखाने सुद्धा परवडत नाहीत.
या सर्वांचा विचार करून DYFI या संघटनेने जिल्हा शल्य-चिकित्सक परभणी यांना वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय पूर्णा यांच्या मार्फत निवेदन दिले. या निवेदनाच्या प्रती तहसील कार्यालय पूर्णा व नगरपरिषद पूर्णा यांनाही दिल्या आहेत.
या निवेदनावर डीवायएफआयचे जिल्हा अध्यक्ष नसीर शेख, आनंद वाहिवळ, अमन जोंधळे, सचिन नरनवरे, अजय खंदारे, तुषार मोगले आणि जय यंगडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.