पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड येथील टाटा समूहाच्या टाटा मोटर्स लि. कंपनीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे. नोंदणीकृत नसलेल्या मालमत्तेवरील २५९ कोटी रुपयांच्या थकित करा संदर्भात ही नोटीस बजावण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे म्हणणे आहे की, महापालिकेचे अधिकारी नोंदणी नसलेल्या मालमत्तेची करासंदर्भातील निरीक्षण करण्यासाठी गेले असता मनपाच्या अधिकाऱ्यांना टाटा मोटर्सच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारावरच अडवण्यात आल्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपायुक्त स्मिता झगडे यांनी सांगितले. तसेच कंपनीला आम्ही दोन नोटीस दिल्या आहेत. त्यामध्ये एक नोटीस १९४ कोटी रुपयांची तर दुसरी नोटीस ६५ कोटी रुपयांची आहे. ही नोटीस २५ जूनला देण्यात आली असून कंपनीला त्यांचे आक्षेप नोंदवण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर आम्ही पुढील कारवाईला करू, असे स्मिता झगडे यांनी म्हटले आहे.
सन २००८ ते २०१९ या कालावधीत ‘टाटा मोटर्सने कारखान्याच्या परिसरात काही बांधकामे केली आहेत, मात्र कंपनीने स्थानिक प्रशासनाकडे अद्याप त्याची नोंदणी केलेली नाही.
टाटा मोटर्सने मनपाच्या अधिकाऱ्यांना कंपनीत प्रवेश न दिल्याने मनपाने सॅटेलाईट इमेज घेतल्या आहेत. त्यानुसार परिसरात किमान ८ हेक्टर जमिनीवर पार्किंग शेड्स, कॅन्टिन, कार्यालये इत्यादींचे बांधकाम करण्यात आहे, त्याआधारे करा संदर्भातील नोटीस बजावण्यात आली असल्याचे झगडे यांनी सांगितले.
या प्रकरणावर टाटा मोटर्सने म्हटले आहे की, कंपनी नेहमी कायद्याचे पालन करते, भोसरी येथील मालमत्तेनुसार टाटा मोटर्सने मनपाला वेळोवेळी कर दिला आहे. नेहमीच्या कामकाजाच्या रुपातच पिंपरी चिंचवड महापालिकेकडून भोसरी येथील बांधकामांचे मूल्यमापन केले जाते आहे.