ढाका : बांगलादेशात कोरोनाचा प्रचंड कहर निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण देशातच पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. गेल्या एक महिन्यापासून बांगलादेशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला असून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे देशात आठवडाभरासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. बांगलादेशचे परिवहन मंत्री ओबेदुल कादीर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
ओबेदुल कादीर यांनी आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन बांगलादेशमध्ये आठ दिवसाचा लॉकाडऊन करण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे.
5 एप्रिलपासून सात दिवस हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. या काळात देशातील सर्व कार्यालये आणि कोर्ट बंद राहणार आहेत. परंतु, उद्योग आणि मिल्स रोटेशनपद्धतीने सुरू राहतील. मिल बंद केल्यास कामगार त्यांच्या घरी परततील म्हणून मिल्स सुरू ठेवण्यात येणार असल्याचं कादीर यांनी सांगितलं.
आशिया खंडातील पहिला देश
कोरोना वाढत असल्याने संपूर्ण बांगलादेशाने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण देशात लॉकडाऊन करणारा बांगलादेश हा आशिया खंडातील पहिला देश ठरला आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान कार्यालयाने कोरोना रोखण्यासाठी 18 मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. त्यात गर्दी टाळण्यावर अधिक भर देण्यात आला होता. तसेच सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना मनाई घालण्यात आल्या आहेत. तसेच अशा कार्यक्रमांपासून लोकांनी दूर राहण्याचं आवाहनही करण्यात आलं होतं. तसेच बसमध्ये क्षमतेपेक्षा निम्मे प्रवासी घेऊनच प्रवास करण्याची मुभाही देण्यात आली होती.
24 तासांत रुग्णसंख्या वाढली
बुधवारी 24 तासांत बांगलादेशात कोरोनांची रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. बुधवारी सापडलेल्या रुग्णसंख्येने बांगलादेशातील आजवरचे सर्व विक्रम मोडले आहेत. बांगलादेशात एप्रिलमध्ये 6469 रुग्ण सापडले होते. तर एकट्या बुधवारी अवघ्या 24 तासात देशात 5358 रुग्ण सापडले आहेत. गेल्यावर्षी मार्चमध्ये सापडलेल्या रुग्णसंख्येपेक्षाही ही संख्या सर्वाधिक होती. तसेच मृत्यूचे आकडेही वाढताना दिसत आहेत. बांगलादेशात गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे 50 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बळींची संख्या 9,155 वर पोहोचली आहे. बांगलादेशात आतापर्यंत एकूण 6,24,594 रुग्ण आहेत.