Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवड"संविधानाची पायमल्ली संवैधानिक मार्गाने होते आहे" - संजय आवटे

“संविधानाची पायमल्ली संवैधानिक मार्गाने होते आहे” – संजय आवटे

फुले – शाहू – आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला – पुष्प दुसरे

पिंपरी चिंचवड/क्रांतीकुमार कडुलकर:दि.१३
– “संविधानाची पायमल्ली संवैधानिक मार्गाने होते आहे ! हे म्हणजे लग्नापासून सर्व गोष्टी अवैध ; पण बाळ मात्र वैध, असा प्रकार आहे!” असे मत ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी श्री दत्त मंदिर चौक , मोहननगर, चिंचवड येथे शुक्रवार ,दिनांक १२ मे २०२३ रोजी केले. जय भवानी तरुण मंडळ आयोजित सहा दिवसीय फुले – शाहू – आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना : आजचे सामाजिक, राजकीय वास्तव!’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना संजय आवटे बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे अध्यक्षस्थानी होते; तसेच उद्योजक सागर धुमाळ, फिरोज शेख, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पवार, फकिरा ब्रिगेडच्या अध्यक्ष वैशाली पवार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

संजय आवटे पुढे म्हणाले की, “सद्य:परिस्थितीत आपला देश कुठला, संविधान कोणते? असे प्रश्न मनात निर्माण होऊ लागले आहेत; पण म्हणूनच संविधानावर बोलण्याची आवश्यकता आजच्या काळातच जास्त आहे. आपल्याला वाटतो तेवढा अंधार प्रभावी नसतो;अंधाराची छाती छप्पन्न इंची असली तरी एक पणती अंधार नाहीसा करू शकते . प्रत्येकाला ‘मन की बात’ करता येते, हेच आपल्या संविधानाचे मोठे सामर्थ्य आहे. तुमचा मुद्दा पटला नाही तर मी तो खोडून काढेल; पण तुम्हाला तुमचा मुद्दा मांडता यावा यासाठी यासाठी मी जिवाची बाजी लावेल ! असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आम्हाला सांगितले आहे.


सध्या बाप पळवणारी टोळी आली आहे.आमच्या महापुरुषांना पळवायला त्यापूर्वीच सुरवात झाली आहे.या परिप्रेक्षात गांधी, नेहरू,आंबेडकर यांचा वारसा समजून घेतला पाहिजे.’लष्करे तोयबा’पेक्षाही ‘लष्करे होयबा’ निर्माण झाले आहेत, ही चिंताजनक बाब आहे. अर्थात कितीही विपरीत परिस्थिती निर्माण झाली तरी देशातील सर्वसामान्य माणूस हा वैचारिक क्रांती घडवू शकतो, असा विश्वास बाबासाहेबांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी जाहीरपणे व्यक्त केला होता.‌ ‘आम्ही भारताचे लोक ही राज्यघटना आमच्या प्रति अर्पण करीत आहोत!’ असे सूचित करणारी ही जगातील एकमेव राज्यघटना असून सर्वसामान्य माणूस तिचा केंद्रबिंदू आहे.

‘केरळ स्टोरी’मध्ये अतिरंजित , विपर्यस्त चित्रण करण्यात आले आहे. ‘केरळ स्टोरी’ऐवजी ‘कुरुलकर स्टोरी’ असा नवा चित्रपट निर्माण व्हायला हवा .‌ सन २०१४ पासून नवा देश जन्माला आला आहे, असा जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास प्रसारित केला जातो आहे. वास्तविक भारत आणि पाकिस्तान दोन्ही एकाच वेळी उदयाला आलेत; पण पाकिस्तान कोसळला आहे; तर भारत दिमाखात उभा आहे. यामागे भारतीय संविधान हेच कारण आहे, असे मत पाकिस्तानी लेखिका आयशा सिद्दिका यांनी व्यक्त केले आहे. जातीवैविध्य हे भारताचे सौंदर्य आहे, असे बराक ओबामा यांनी म्हटले आहे.भारत हा हिंदूंचा आहेच; पण त्याचबरोबर तो इथल्या प्रत्येक धर्मियांचा आहे. महाडच्या सत्याग्रहासाठी फत्तेखान या माणसाने आपली जागा बाबासाहेबांना दिली होती.



परंपरेचा अवकाश सोडू नका, महिलांना चळवळीत सहभागी करून घ्या आणि तरुणांशी त्यांच्या भाषेत बोला, अशी त्रिसूत्री परिवर्तनवादी चळवळीतील लोकांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितली आहे. वैचारिक पिढी निर्माण व्हावी हे संविधानाचे आव्हान आहे!” असे प्रतिपादन संजय आवटे यांनी केले. संयोजक मारुती भापकर यांनी, “प्रबोधनाला पर्याय नाही!” असे मत प्रास्ताविकातून व्यक्त केले. मानव कांबळे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “भारतीय संविधानाचा स्वीकार करून जवळपास पंचाहत्तर वर्षे होऊनही तळागाळातील जनता मूलभूत अधिकारांपासून वंचित आहे!” अशी खंत व्यक्त केली.जय भवानी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संयोजनात परिश्रम घेतले.‌ गिरीश वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र घावटे यांनी आभार मानले.

संबंधित लेख

लोकप्रिय