नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्यासमोर अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी गोंधळ घातला.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी या अंगणवाडी सेविकांना बोलवून घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, गोंधळ घालणाऱ्या दोन अंगणवाडी सेविकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पालकमंत्री दादा भुसे हे देखील नाशिकमध्ये आहेत.
दोन अंगणवाडी सेविका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आल्या. त्यांनी टाहो फोडत मुख्यमंत्र्यांना आपल्या वेदना सांगण्यात प्रयत्न केला. याचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये या दोन्ही अंगणवाडी सेविका ढसाढसा रडत आपल्या मागणी मुख्यमंत्री शिंदेंना सांगताना दिसत आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी आदी मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. शासनाने अद्याप अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत काेणताच निर्णय जाहीर केलेला नाही.
