कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या मागणीची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून दखल
पिंपरी, दि.१४ : महाराष्ट्रातील कारखाने, अस्थापना व इतर छोट्या कार्यक्षेत्रात कामगारांच्या सुरक्षेबाबत दुर्लक्ष होत असून यामुळे अनेक कामगारांचे हात, पाय, निकामी होत असून चुकीच्या निर्णयामुळे अनेक कामगारांचे मृत्यू होत आहेत, त्यामुळे राज्यातील कष्टकरी कामगारांच्या सुरक्षेबाबत दखल घ्यावी व तशी सक्ती करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ़ यांच्याकडे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली होती.
याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव रा.शा. कौरते यांनी संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय कामगार भवन मुंबई यांना आदेश देऊन निवेदनात नमूद मुद्द्यांच्या अनुषंगाने कारखाने अधिनियम १९४८ च्या तरतुदीनुसार आवश्यक कारवाई करावे असे आदेश देण्यात आले आहेत.
कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी दिलेल्या निवेदनात महाराष्ट्रातील कारखाने, अस्थापना औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळाचे नुकसान टाळण्यासाठी सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरण रक्षणासाठी म्हणून दर वर्षी ४ मार्च ते ११ मार्च या कालावधीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. तसेच २ नोव्हेंबर हा सुरक्षा दिन साजरा केला जातो. नुकताच हा महाराष्ट्रातील काही अस्थापना व कारखान्यासमोर सुरक्षा फलक दिसले तर कुठे दिसले नाही, याबाबत कष्ट करणाऱ्या कामगारांमध्ये जनजागृती केली जात नसून त्यांची अवयव हानी व जिवितहानी टाळण्यासाठी कामगारांना सुरक्षाबाबत प्रशिक्षण देण्यात यावे व याचे तंतोतंत पालन न करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. देशात उद्योग क्षेत्रातील कामगार यांच्या हितासाठी, सुरक्षेसाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदने महत्वाच्या तरतूदी केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय कंपन्या सोडल्या तर छोटे कारखाने तसेच प्रवेशद्वारावर फलक लावणे पलीकडे काहीच काम होत नाही, सुरक्षा सप्ताहाचे महत्त्व काय हे सर्व प्रकारचे कामगार संघटित, असंघटित असुरक्षित कंत्राटी कामगारांनाही या कामगारांना प्रशिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. मोठमोठ्या कारखान्या बरोबरच खान, रेल्वे, गोदामे, बंदरे, रस्ते पूल निर्मिती, धरणे विभाग छोटी खाजगी आस्थापने यामध्येही याबाबत जनजागृती व सुरक्षेकामी आदेश पारित करावेत अशी मागणी केली होती. त्यानुसार रा. शा. कौरते यांनी आदेश काढले आहेत.
कष्टकरी संघर्ष महासंघाच्या निवेदनावर उपाध्यक्ष राजेश माने, महिला विभागाच्या माधुरी जलमूलवार उपाध्यक्ष भास्कर राठोड, विनोद गवई, बालाजी इंगळे, उमेश डोर्ले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.