Saturday, October 5, 2024
Homeनोकरीस्पर्धा परीक्षेची तयारी करताय ? मग तर हे नक्की वाचा !

स्पर्धा परीक्षेची तयारी करताय ? मग तर हे नक्की वाचा !

पुणे:  महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) आणि केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (युपीएससी) घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांच्या टप्प्यांवर यश मिळवले आहे, मात्र कोणतेही पद मिळाले नाही, म्हणून नोकरीच्या शोधात असाल तर, ही माहिती तुमच्यासाठीच आहे.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला सरकारी नोकरी मिळणे, हे अशक्यच आहे. या परीक्षेत अपयश आले म्हणजेच आपण आयुष्यात सर्वकाही गमावले, अशी अनेकांची अवस्था झालेली पाहायला मिळते. स्पर्धा परीक्षेचा उमेदवार हा हुशार आणि विचार करणारा असतो. त्याने विविध विषयांचा अभ्यास केलेला असतो. खासगी, राजकीय, शासकीय कार्यालये, व्यावसायिक, खेळाडू, सेलेब्रेटी, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, सीए ऑफिस, इव्हेंट मॅनेजमेंट आदी ठिकाणी सहायक, स्वीय सहायक, जनसंपर्क अधिकारी, लेखनिक, स्पेशल ड्यूटी ऑफिसर, मीडिया असिस्टंट आदी पदांवर मोठ्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. त्यांना अशा बुद्धिमत्तेची आवश्यकता आहे. ती थेट ‘एमपीएससी’ करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून मिळू शकते. त्यामुळे ज्यांना काही कारणाने परीक्षेतून पद मिळवता आले नाही किंवा आता पर्यायी मार्ग निवडायचा आहे, अशा उमेदवारांना या संधीचा विचार करता येऊ शकतो, असे ऑफिस मॅनेजमेंट तज्ज्ञ चित्रसेन गायकवाड यांनी सांगितले.

गायकवाड म्हणाले की, अनेक वर्षांपासून विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात, मात्र अनेकांना मनासारखी नोकरी, पद मिळाले नाही, म्हणून नैराश्यात जातात. जसे परीक्षा कशी द्यावी, याचे मार्गदर्शन दिले जाते. त्याप्रमाणे अपयश आले तर ‘बी’ प्लॅन तयार ठेवा, असे सांगितले जाते, मात्र नेमके काय करावे, हे सांगितले जात नाही. त्यामुळे त्या उमेदवाराला काय करावे, हे सुचत नाही. अशा उमेदवारांची मार्केटमध्ये खरी गरज आहे. फक्त उमेदवारांनी त्यात भर म्हणून जर काही आवश्यक कौशल्ये आत्मसात केली तर ४० ते ५० हजार रुपयांची नोकरी सहज मिळू शकते.

संबंधित लेख

लोकप्रिय