नाशिक : बांधकाम कामगारांचे नूतनीकरणास एक वर्ष मुदतवाढ देण्याची मागणी भारतीय ट्रेड युनियन केंद्र (सिटू) च्या वतीने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, महाराष्ट्र’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीरंगम यांच्याकडे ईमेल निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यामध्ये १ मार्च २०२० पासून बांधकाम कामगारांच्या नोंदणीचे व नूतनीकरणाचे काम बंद आहे. त्यापूर्वीही राज्यातील अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे नोंदणी व नूतनीकरण होऊ शकलेले नाही. नोंदणी व नूतनीकरणासाठीचे हजारो अर्ज अजूनही पडून आहेत. लॉकडाऊन लागू झाल्यामुळे पुन्हा नोंदणी व नूतनीकरण बंद आहे. यामुळे मंडळातर्फे लागू असलेल्या जवळपास ३० योजनाचे लाभ बांधकाम कामगारांना मिळत नाहीत याकडे सीटूने बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे लक्ष वेधले आहे.
लाक डाउन काळात जाहीर केलेले २००० रुपयांचे अर्थसहाय्य फक्त नऊ लाख कामगारांना मिळाले पण अजुन तेवढ्याच कामगारांना ते मिळू शकले नाही. आता पुन्हा सरकारने ३००० रुपये अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे. नूतनीकरणास मुदतवाढ दिल्यास हा लाभ कामगारांना मिळेल अन्यथा ही योजना कागदावरच राहील असे सिटूचे म्हणणे आहे.
सध्या मंडळाने ऑनलाइन पद्धतीने नोंदणी व नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. कामगारांना खूप प्रयत्न करूनही नोंदणी व नूतनीकरण करणे शक्य होत नाही. ह्या स्थानिक पातळीवरच्या समस्या आहेत. यामुळेही भविष्यकाळात बहुसंख्य बांधकाम मजुरांना लाभ मिळणार नाहीत असेही सिटूने निदर्शनास आणून दिले आहे.
नोंदणी व नूतनीकरण न झाल्यामुळे लाभाची हजारो प्रकरणे मंडळाकडे प्रलंबित आहेत याकडेही सीटूने मंडळाचे लक्ष वेधले आहे. म्हणून ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत ज्यांची नोंदणी व नूतनीकरण झालेले आहे अशा सर्व बांधकाम कामगारांना एक वर्ष मुदतवाढ द्यावी व लाभ मिळण्यासाठी नूतनीकरणाची अट २०२० साला साठी स्थगित करण्यात यावी, अशी मागणी सीटूने केली आहे. यामुळे ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत ज्यांची नोंदणी झाली आहे व नूतनीकरण झाले आहे अशा बांधकाम कामगारांना मंडळाचे विविध लाभ मिळू शकतील असा दावा सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केला आहे.