Sunday, July 14, 2024
Homeविशेष लेखछत्रपती संभाजी महाराज यांची जयंती विशेष लेख !

छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती विशेष लेख !

 

आज १४ मे. छत्रपती संभाजी महाराज यांची आज तारखेनुसार जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगनायकाच्या पोटी जन्मलेले संभाजी महाराज त्यांच्या वीरमरणाने महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर झाले. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा करून शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी स्वराज्य टिकवले. मुघल, आदिलशहा, सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज आणि स्वकीय शत्रूंशी झुंज देत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ते एकटेच लढत राहिले. महाराजांच्या मृत्युनंतर केवळ ९ वर्षे त्यांना राज्यकारभार सांभाळता आला. पण या ९ वर्षांतच त्यांनी उभ्या हिंदुस्थानात आपला धाक व दरारा बसवला. इतका की शेवटी स्वतः औरंगजेब दिल्लीहून संभाजी राजांचा पाडाव करण्यासाठी महाराष्ट्रात अमाप फौज घेऊन चालून आला.

संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे १२० युद्धे केली. यातील एकाही लढाईत ते पराभूत झाले नाहीत. मात्र, स्वकीयांनी टाकलेल्या फितुरीच्या जाळ्यात संभाजी महाराज अडकले आणि कैद झाले. १ फेब्रुवारी, १६८९ रोजी संगमेश्वरला असताना मुघलांनी फितुरीच्या बळावर संभाजी राजांवर हल्ला केला. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवी कलश यांना जिवंत पकडले. त्यांना पुढे औरंगजेबापुढे बहादुरगड येथे आणण्यात आले. हा गड आता ‘धर्मवीरगड’ हे नाव सार्थपणे मिरवतो. औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. चिडलेल्या औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांना विदूषकाचे कपडे घालून त्यांची अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढली. 

धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे आणखी एक आमीष औरंगजेबाने संभाजी राजांना दिले. पण अनन्वित अत्याचार सहन करूनही राजांनी धर्मांतर करण्यास स्पष्टपणे नकार दिला. शेवटी ४० दिवस प्रचंड हालअपेष्टा भोगल्यानंतर मराठ्यांचा हा पराक्रमी राजा केवळ मृत्युलाच शरण गेला. हा छत्रपती उत्तम योद्धाच नाहीतर उत्तम साहित्यिकही होता. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी ‘बुधभूषण-राजनीती’ हा संस्कृत ग्रंथ लिहिला. या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील शिवाजीराजे यांचा त्यांनी उल्लेख केला आहे. ते लिहितात, “कलीच्या रुपाने जेव्हा महासर्पाने पृथ्वीला वेढा घातला आणि धर्माचा विध्वंस केला तेव्हा पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी ज्याचा अवतार झाला, त्या शिवप्रभूंची विजयदुदुंभी युगानुयुगे गर्जत राहू दे.” एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन इतिहास घडविणारा आणि इतिहास लिहिणारा हा एक अलौकिक राजा होता. संभाजी महाराज म्हणजे भावना आणि कर्तव्य यांचं एक अजब रसायन होते. 

एकीकडे त्यांच्यात शिवाजी महाराजांची कर्तव्य कठोरता होती तर दुसरीकडे त्यांच्यात सईबाईंचं सात्विक सोज्वळ मनही होतं. त्यामुळेच ते भावनाशीलही होते आणि अत्यंत क्रोधीही होते. अवघ्या बत्तीसाव्या वर्षी त्यांना दूर्दैवी मरण आलं. शिवाजी महाराजांशी त्यांची अनेकदा तुलना केली जाते आणि त्यांच्यावर अन्याय केला जातो. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की शिवाजी महाराजांचे वडील आणि आई दोघेही राजकारण धुरंधर आणि मनस्वी स्वभावाचे महत्त्वाकांक्षी लोक होते. तेच गुण महाराजांमध्येही उतरले. दोघांचीही छत्रछाया महाराजांवर दीर्घकाळ होती. संभाजी महाराजांना मात्र मातृसुख लाभलं नाही. आणि पिता कायम राजकारणात दंग. वयाच्या तेवीसाव्या वर्षी महाराजांच्या निधनानंतर त्यांच्याकडे एक बऱ्यापैकी मोठं राज्य आलं होतं. पण शत्रूही कमी नव्हते. एकवेळ बाहेरचे उघड शत्रू परवडले पण अंतस्थ शत्रू मात्र कठीणच. त्यांतले कितीतरी महाराजांचे साथीदार होते. स्वराज्याच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे संभाजी सारख्या कालच्या पोराला आपला राजा माननं अनेकांना जड गेलं असणार. त्यांच्यावर आपला ताबा ठेवण्याचाच अनेकांचा प्रयत्न होता. जो त्या मानी माणसाला अर्थातच कधीच मानवला गेला नाही. दुसरीकडे वतनासाठी अनेक लोक त्यांच्यापासून दूर गेले. उभा हिन्दूस्थान जिंकण्यासाठी मोकळा असतांना हे लोक मात्र टीचभर वतनासाठी संभाजी राजांशी दुरावा राखून होते. शेवटी त्यांनीच संभाजी राजांचा घात केला. 

केवळ ९ वर्षांच्या कालखंडात संभाजी राजांनी आपल्या पराक्रमाची चुनूक अनेकदा दाखवून दिली होती. त्यांना योग्य ते मित्र आणि मार्गदर्शक मिळाले असते, तर परिस्थिती कदाचित वेगळी झाली असती. पण नियतीच्या मनात काही वेगळे होते. कैदेत असतांनाही त्यांचा स्वाभिमान मात्र सुटला नाही. मला कायम वाटतं की शिवाजी महाराज अशा परिस्थितीत अडकले असते तर कदाचित त्यांनी काहीतरी राजकारण करून स्वतःची सुटका करून घेतलीच असती. जशी त्यांनी आग्र्यात केली होती. ते जन्मजात राजकारणी होते. पण संभाजी महाराज मात्र भावनिक जास्त असल्यामुळे त्यांना औरंगजेबाचा कावा ओळखता आला नाही. आणि औरंगजेबालाही हा तिखट स्वाभीमानी शत्रू कदापीही शरणागती पत्करणार नाही याची खात्री असावी म्हणूनच त्यानेही त्यांना जीवंत न ठेवण्याचाच निर्णय घेतला असेल. अर्थात इतिहास हाच आहे की आज संभाजी महाराज नाहीत. पण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊनच मराठ्यांनी पुढे हिन्दूस्थानात आपला धाकदरारा निर्माण केला हेही तितकेच खरे आहे. या अजरामर संभाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने त्यांना मानाचा मुजरा.

वैभव जाधव

सातारा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय