Friday, March 29, 2024
Homeराजकारणतोक्ते चक्रीवादळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला रत्नागिरी दौरा ; एवढे झाले...

तोक्ते चक्रीवादळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला रत्नागिरी दौरा ; एवढे झाले आहे नुकसान

संपूर्ण आढावा घेऊन मदत करणार, कोणीही वंचित राहणार नाही – रत्नागिरी दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

रत्नागिरी :  तोक्ते चक्रीवादळाने जे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे पूर्ण होताच त्याचा संपूर्ण आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत करु. यात कोणीही वंचित राहणार नाही अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी येथे दिली.

जिल्ह्यात झालेल्या चक्रीवादळ नुकसानीचा प्राथमिक आढावा मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत येथे घेतला. यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार तसेच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

तोक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यातील 5 तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात अधिक नुकसान  राजापूर व रत्नागिरी तालुक्यात आहे. वादळाचा फटका बसलेल्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांचा पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. याची सुरुवात रत्नागिरी येथील बैठकीने झाली.

जिल्ह्यात चक्रीवादळाने आंबा आणि काजू तसेच नारळाच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंचनामा योग्य पद्धतीने करुन नेमकेपणाने आकडेवारीसह प्रस्ताव सादर करा असे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी या बैठकीनंतर अधिकाऱ्यांशी बोलताना दिले.

कोविड आढावा

या वेळी जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचाही आढावा याच बैठकीत घेण्यात आला. रुग्णांना चांगले उपचार, सुविधा आपण देत आहोत. सोबतच रुग्णसंख्या प्रामुख्याने मृत्यूचे प्रमाण कमी होईल या दृष्टिकोनातून  सर्वांनी प्रयत्न करावेत असे ते म्हणाले.

दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येईल असे म्हटले जात असले तरी योग्य ती खबरदारी आणि उपाय योजल्याने आपण ती येणारच नाही यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न करु असे मुख्यमंत्री म्हणाले.

मोठ्या प्रमाणावर नुकसान

जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी यावेळी सादरीकरण केले. या चक्रीवादळात जिल्ह्यात 2 जणांचा मृत्यू झाला असून 8 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. मृत पशुधनाची संख्या 11 आहे.

जिल्ह्यात 17 घरे पूर्णत: बाधित झाली असून  अंशत: बाधित घरांची संख्या 6766 आहे. यात सर्वाधिक दापोलीत 2235 आहेत. रत्नागिरी तालुक्यात 1084 तर राजापुरातील  891 घरांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या गोठ्यांची जिल्ह्यातील संख्या 370 इतकी आहे.

वादळात वाऱ्यामुळे 1042 झाडे पडली. यात सर्वाधिक 792 झाडे राजापूर तालुक्यात पडली. रत्नागिरीत ही संख्या 250 इतकी आहे.

चक्रीवादळात 59 दुकाने व टपऱ्यांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या शाळांची संख्या 56 आहे. या सर्व शाळा राजापूर तालुक्यामधील आहेत.

शेती

चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणावर फळबागांचे नुकसान झाले. अंदाजे 1100 शेतकऱ्यांचे या साधारण 2500 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. यातील 3430 शेतकऱ्यांच्या 810.30 हेक्टरवरील पंचनाम्यांचे काम आजपर्यंत पूर्ण झाले आहे.

वीज

चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका विद्युत वितरण कंपनीला बसला. यात 1239 गावातील विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद झाला होता. आतापर्यंत 1179 गावांचा पुरवठा आता पूर्ववत करण्यात आला आहे.

बाधित उपकेंद्राची संख्या 55 व फिडरची संख्या 206 आहे. याची दुरुस्तीदेखील आता पूर्ण झाली आहे. वीज खांबांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उच्चदाब वाहिनीचे 485 खांब बाधित झाले असून यापैकी 125 पूर्ववत करण्यात आले. गावागावात पडलेल्या वीज खांबाची संख्या 1233 इतकी आहे. यातील 133 खांबांची उभारणी आतापर्यंत पूर्ण झाली आहे.

मत्स्य व्यवसाय

जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर आश्रयास आलेल्या बोटींपैकी 3 बोटी पूर्णत: तर 65 बोटींचे अंशत: नुकसान झाले. 71 जाळ्यांचेही नुकसान झालेले आहे. अंदाजित नुकसान 90 लाख रुपयांपर्यंत आहे.

या चक्रीवादळात जिल्हा परिषदेच्या 301 मालमत्ता बाधित झालेल्या आहे. अंदाजे 1 कोटी 98 लाख 84 हजार पेक्षा जास्त अधिक नुकसान आहे.

ई-उद्घाटन

जिल्हा पोलिसांतर्फे सुसज्ज असे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. याचे ई-उद्घाटन याप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी केंद्राबाबत यावेळी माहिती दिली तसेच त्यावरील एक लघुपट यावेळी दाखवण्यात आला.

साधेपणाने बैठक

बैठकीसाठी व्यासपीठ उभारले असले तरी तेथे न जात मुख्यमंत्री महोदयांनी व्यासपीठासमोरील डी मध्ये खुर्च्या लावण्यास सांगितले व साधेपणाने सादरीकरण व अधिकाऱ्यांशी चर्चा त्यांनी केली. स्वागतासाठी हार – बुकेदेखील नको अशा सूचना दिलेल्या असल्याने साध्या पद्धतीनेचे पूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, माजी आमदार हुस्नबानु खलिफे, जि.प. माजी अध्यक्ष रोहन बने, नगराध्यक्ष बंडया साळवी, मुख्य सचिव सीताराम कुंटे, विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इन्दुराणी जाखड, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय