कळवण प्रतिनिधी । सुशिल कुवर
तीनशे वर्षानंतर सुध्दा या देशात छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्तित्व आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श प्रेरणदायी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. कळवण येथे उभारण्यात आलेल्या उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात उंच पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी ते उपस्थित होते. त्यावेळी पवार बोलत होते.
व्यासपीठावर छत्रपती संभाजीराजे, अनिल राम सुतार, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पालकमंत्री दादा भुसे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार नितीन पवार, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, नगराध्यक्ष कौतिक पगार, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार, किर्तनकार संजय धोंडगे, प्रा. यशवंत गोसावी, हेमंत टकले, श्रीराम शेटे, रवींद्र पगार, रंजन ठाकरे, विशाल नरवाडे, बंडू कापसे आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
शासनाने कांद्याचा वांदा सोडविण्यासाठी कांदा प्रक्रिया उद्योग उभारण्याची विनंती करून उपस्थितांनी शिवाजी महाराजांचे पंचतत्वे जरी घेतलीत तरी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सार्थक होईल. असे सांगत शासनाने नाशिक जिल्ह्यातील पाच किल्ले माझ्याकडे द्या. स्वखर्चाने संवर्धन करण्याची ग्वाही युवराज छत्रपती संभाजी राजेंनी व्यक्त केली.

यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी अर्थसंकल्पाची माहिती देऊन येणार्या दहा दिवसांत कांदा उत्पादक शेतकर्यांसाठी सभागृहात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी शिवरायांच्या विचारांवर वाटचाल करण्यासाठी एकत्र राहू व देशाला महासत्ता बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले. आमदार नितीन पवार यांनी दळवट येथे माजी मंत्री एटी पवार यांचे स्मारक उभारण्याचे सांगितले.
यावेळी माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रा. यशवंत गोसावी, किर्तनकार संजय धोंडगे यांनी मनोगत व्यक्त करून शेतकरयांचा विचार करण्याची मागणी केली. तर शिल्पकार अनिल राम सुतार यांनी पुतळ्याचे वैशिष्ट्य सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांनी केले. तर राकेश हिरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शिवस्मारक समितीचे सर्व सदस्यांसह तालुक्यातील शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.