चांदवड, ता.२ (सुनिल सोनवणे) : भ्रष्टाचार निर्मूलन समितीने वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे वृक्ष लागवडी संदर्भात सन २०१३-१४ या सालापासून किती वृक्ष लावले व लागवड केली, त्यासाठी किती पैसा खर्च झाला अर्थात शासनाचा निधी आला यासंदर्भात माहितीच्या अधिकाराखाली तीन महिन्यांपासून माहिती मागितली होती परंतु माहिती देण्यास वनपरिक्षेत्र कार्यालय टाळाटाळ करत होते. त्यामुळे आज कार्यकर्त्यांनी “थालीनाद आंदोलन” करून विहित मुदतीत माहिती मिळाली नाही म्हणून गणुर चौफुली रेस्ट हाऊस पासून थालीनाद आंदोलनाला सुरुवात करून वनपरिक्षेत्र कार्यालय चांदवड या कार्यालयापर्यंत थालीनाद करत गेले.
वनपरिक्षेत्र कार्यालयाचे प्रभारी अधिकारी चौधरी यांनी काही कागदपत्र व माहिती आज भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना दिली. परंतु परसुल शिवारातील गौणखनिज उपसा करून त्यात काही भ्रष्टाचार झालेला आहे का त्याची माहिती मिळू शकली नाही या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन पुढील काही दिवसात सविस्तरपणे माहिती देण्यात येईल असे वनपरिक्षेत्राधिकारी चौधरी यांनी आश्वासन दिले.
यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे मुख्य प्रवर्तक राजेंद्र खांगळ, आनंद बनकर, दीपक हांडगे, समाधान आहेर, शांताराम जाधव, शांताराम जाधव, प्रमोद जाधव, अतुल गांगुर्डे, शहाजी ठाकरे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.