चांदवड / सुनिल सोनवणे : चांदवड नगरपरिषद कचरा संकलन नवीन ठेका मंजुरी तात्काळ मिळावी, अशी मागणी भूषण कासलीवाल यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
चांदवडचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी आज जिल्हाधिकारी यांना घन कचरा संकलन व कचरा विलगीकरण ठेकाची मुदत सुमारे एकवीस दिवसांपासून संपलेली आहे. तरी या ठेक्यास तत्काळ मंजुरी द्यावी अशी मागणी केली आहे.
चांदवड शहरात गटारी तुडुंब भरून तुंबल्यामुळे शहरात डेंगू मलेरिया अशा डासांचे प्रमाण वाढत असून शहरात आजार व दुर्गंधी होऊन अनेक प्रकारचे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे नवीन ठेका काढण्यास नगरपरिषदेला परवानगी द्यावी, अशी मागणी कासलीवाल यांनी केली आहे.
तसेच भूषण कासलीवाल यांनी निवेदनात म्हटले आहे की, सोशल मीडियावर तक्रारी वाढत आहेत यामुळे प्रशासनास देखील वेठीस धरले जात आहे. तरी आपल्या परीने सहकार्य करून तात्काळ ठेक्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे.