चांदवड (सुनिल सोनवणे) : चांदवड येथील योगदर्शन फाउंडेशन, चांदवड संचलित योग विद्या धाम, चांदवड आयोजित आणि इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन दिल्ली व पारस मिरॅकल, नगर यांच्या सहकार्याने पंचायत समिती चांदवड कार्यालयातील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मोफत जलनेती प्रशिक्षण अभियान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी पंचायत समिती सहा. गट विकास अधिकारी रावसाहेब वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे तसेच योगदर्शन फाउंडेशन, चांदवडचे अध्यक्ष व योग विद्या धाम, व चांदवडचे केंद्रप्रमुख राहुल (अंबादास) बी. येवला उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते पंचायत समितीच्या सर्व विभागातील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना मोफत जलनेती पात्रांचे वाटप करण्यात आले.
योग प्रशिक्षक राहुल बी. येवला यांनी जलनेती ही नासिकामार्गाची शुद्धिक्रिया असून कोविड १९ या व इतर संसर्गजन्य आजारासाठी तसेच श्वसनाच्या विकारांवर कशी प्रभावी आहे आणि तंत्रशुद्ध पद्धतीने योग व जलनेतीचा अभ्यास कसा करावा शिवाय आरोग्यासाठी जलनेतीचे अनेक फायदे सांगितले. व प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच कोविडच्या सर्व नियमांचे पालन करत वेगवेगळ्या गटात सर्वांकडून योग व जलनेतीचा प्रात्यक्षिक अभ्यास करून घेतला. शेवटी सर्व लाभार्थी कर्मचाऱ्यांनी जलनेती आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असून खुप चांगले अनुभव आल्याचे मनोगत व्यक्त केले. तसेच जलनेती शिबिर घेतल्या बद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले. तसेच प्रमुख अतिथी डॉ. पंकज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मोफत जलनेती अभियान हे समाजाच्या आरोग्यासाठी कौतुकास्पद कार्य असल्याचे प्रतिपादन केले तर रावसाहेब वाघ यांनी जलनेती संसर्गजन्य आजार दूर ठेवण्यासाठी आवश्यक आहे, तरी चांदवड तालुक्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच राहुल येवला यांनी पुढे होण्याऱ्या योग, प्राणायाम व जलनेती शिबिरासाठी इच्छुक नागरिकांनी ९३७०३८२९४२/७३८५२१६९५१ वर संपर्क साधावा असे सांगितले.
शिबिराच्या आयोजनासाठी इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष शिवानंद महाराज, नाशिक जिल्ह्याच्या उपाध्यक्षा डॉ. तस्मिना शेख यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
कार्यक्रमासाठी रावसाहेब वाघ, डॉ. पंकज ठाकरे, एस. एस. देशमुख, पी. बी ठाकरे, यशवंत जाधव, बी.एस. सूर्यवंशी, अशोक अहिरे, विजय अहिरे, अजित मार्कंड, मनोहर अहिरे, नाडगौडा ए. बी. पवार, एम. टी. कुशारे, एस.एस.भारती, पी. बी. बागुल, आर. पी. अहिरे, डी.डी. सूर्यवंशी आदी पंचायत समिती व आरोग्य विभागातील सर्व पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनंत बिरादर व आदी पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.