कोल्हापूर : थकित वेतनासाठी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) च्या वतीने जे. जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालय येथे साखळी उपोषण करण्यात आले.
डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचारी गेल्या ११ महिन्यांच्या थकित वेतन व इतर मागण्यांसाठी आजपासून बेमुदत साखळी उपोषणास बसले आहेत. थकित वेतना बरोबरच ‘प्राध्यापकांची स्थान निश्चिती’, महागाई भत्ता, सर्विस बुक नोंदणी, उच्च शिक्षण वेतनवाढ, प्रॉव्हिडंट फंडामध्ये व ग्रॅच्युइटी फंडामध्ये रक्कम जमा करणे आदी मागण्या प्राध्यापकांनी केल्या आहेत. या मागण्यांसाठी सुटा मार्फत महाविद्यालयाला लेखी कळवून २८ ऑगस्ट २०१९ रोजी लाक्षणीक आंदोलन करण्यात आले होते.
सुटा संघटनेचे पदाधिकारी व महाविद्यालयाचे व्यवस्थापनामार्फत स्वतः ट्रस्ट च्या उपाध्यक्ष सोनाली मगदूम आणि कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक मुदगल यांच्यात १ सप्टेंबर रोजी सुटा कार्यालयात दोन तास चर्चा झाली. या चर्चेमध्ये थकित पगार कोणत्या तारखेला केले जातील या संदर्भातील लेखी माहीती व्यवस्थापनाकडून मागितली होती. परंतु सुटाने ठोस कार्यवाहीबाबत काही जाहीर न केल्यामुळे बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. कोणताही ठोस निर्णय न घेतल्यास सदरचे उपोषण येथून पुढे सुद्धा चालू राहील अशी माहिती सुटा मार्फत कळत आहे.
आज प्रा.डॉ.दिलीप उंडे, प्रा. रंजना उदगावे, प्रा.सरदार शेख, आणि प्रा. रवींद्र यादव हे सदरच्या उपोषणास बसले होते. यावेळी सुटा कोल्हापूरचे पदाधिकारी प्रो. डी. एन. पाटील, प्रा. पी. पी. पाटील, प्रा. युवराज पाटील, प्रा.मिलिंद भिलवडे, प्रा. बी. एन. शिंदे उपस्थित होते.