Friday, April 26, 2024
Homeविशेष लेखमहिला विशेषब्रेकिंग : महाराष्ट्रातील ३ महिलांना 'राष्ट्रीय नारी शक्ती पुरस्कार' उद्या दिल्लीत होणार...

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ३ महिलांना ‘राष्ट्रीय नारी शक्ती पुरस्कार’ उद्या दिल्लीत होणार वितरण !

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त (international womens day) राष्ट्रपती राम नाथ कोविंद (president ramnath kovind) यांच्या हस्ते देशातील २९ कर्तुत्वान महिलांना सन २०२० आणि २०२१ वर्षांसाठीच्या नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

उद्या (दि.८) राष्ट्रपती भवनात हाेणा-या या कार्यक्रमात महाराष्ट्रातील तीन महिलांचा देखील या पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. (Nari Shakti Puraskar)

सन २०२० च्या नारी शक्ती पुरस्काराचे विजेते हे उद्योजकता, कृषी, नवोपक्रम, सामाजिक कार्य, कला आणि हस्तकला, एसटीईएमएम (STEMM) आणि वन्यजीव संरक्षण इत्यादी विविध क्षेत्रांतील आहेत. तसेच सन २०२१ च्या नारी शक्ती पुरस्काराचे विजेते भाषाशास्त्र, उद्योजकता, कृषी, सामाजिक कार्य, कला आणि हस्तकला, मर्चंट नेव्ही, STEMM, शिक्षण आणि साहित्य, अपंगत्व अधिकार अशा विविध क्षेत्रातील आहेत.

महाराष्ट्रातील तीन महिला पुढीलप्रमाणे :

वनिता बोराडे

१. वनिता जोगदेव बोराडे :

महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला सर्पमित्र वनिता जोगदेव बोराडे (Vanita Jagdeo Borade) यांचा समावेश झाला आहे. वनिता बोराडे यांनी आत्तापर्यंत ५१ हजार पेक्षा अधिक विषारी आणि बिनविषारी सापांना जीवदान देत त्यांना जंगलात सोडले आहे.

कमल कुंभार

२. कमल कुंभार :

उस्मानाबाद येथे जन्मलेल्या कमल कुंभार यांचा समावेश करण्यात आला आहे. कमल यांचा रोजंदारी करणा-या मजुर कुटुंबियात जन्म झाला. जेथे एकवेळ जेवणाची भ्रांत तिथे शिक्षणाचा विचार देखील त्यांच्या मनाला शिवला नाही. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कमल यांना विवाह नंतर खूप माेठा संघर्ष करावा लागला. एखादा व्यवसाय करावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले आणि असंख्य अडचणींचा सामना करुन यशस्वी झाल्या.

कमल यांनी सन १९९८ मध्ये कमल पोल्ट्री आणि एकता प्रोड्युसर कंपनी सुरू केली. व्यवसाय किंवा मार्केटिंगचे कोणतेही ज्ञान नसताना केवळ दाेन हजार रुपयांच्या तुटपुंज्या रकमेत कंपनी सुरु करण्याचे केलेले धाडस वीस वर्षांनंतर कंपनी दरमहा सुमारे एक लाख रुपये नफा कमाविते. त्याशिवाय आतापर्यंत पाच हजारहून अधिक महिलांना असेच उद्योग सुरू करण्यासाठी आणि स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले आहे.

सायली आगवणे

३. सायली नंदकिशोर आगवणे :

दिव्यांग कथक नर्तिका सायली नंदकिशोर आगवणे यांचा समावेश करण्यात आला आहे. सायली आगवणे या शिवतीर्थनगर (पुणे) येथील रहिवासी आहे. दिव्यांग असूनही तिने आजपर्यंत वेगवेगळ्या नृत्य स्पर्धेत सादरीकरण करीत आपला ठसा उमटविला आहे. विविध वाहिन्यांवरील नृत्यांच्या शोमध्ये देखील ती भाग घेत असते. यापुर्वी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तिने अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या बहुभाषिक नृत्य आणि नाट्य स्पर्धेत भाग घेऊन सुरुवात केली आणि नंतर बँकॉक, सिंगापूर आणि कोलंबो येथे सादरीकरण केले.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय