नवी दिल्ली : गेल्या आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्य प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर झालेल्या राज्यातील सत्ता बदलानंतर शिंदे फडणवीस सरकारने महापालिका निवडणुका 2017 च्या प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णया विरूद्ध अनेकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या याचिकेवर सातत्याने पुढची तारिख देण्यात येत आहे. आज कोर्टाच्या कामकाजात 39 नंबर वर प्रकरण आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी होऊ शकलेली नाही. आज पुन्हा या प्रकरणावर प्रत्यक्ष सुनावणी होणार की पुढची तारीख मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सुनावणीवर २३ महापालिका, २५ जिल्हा परिषदा, २०७ नगरपालिका आणि पंचायत समिती निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे.